स्वातंत्र्य लढ्यात सहभागी नसणाऱ्या मातृसंस्थेच्या पिल्लांनी सावरकरांवर बोलू नये; उद्धव ठाकरे यांचा भाजपवर हल्लाबोल
संघ स्वातंत्र्य लढ्यात नव्हता. संघाला आता 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यांचं स्वातंत्र्य लढ्यातील योगदान काय आहे? हे आधी सांगा. बाष्कळपणा बंद करा.
मुंबई: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्यावर टीका केल्यानंतर भाजपने ठाकरे गटाला घेरण्यास सुरुवात केली आहे. भाजपच्या या टीकेला खुद्द उद्धव ठाकरे यांनीच उत्तर दिलं आहे. राहुल गांधी यांच्या त्या विधानाशी आम्ही सहमत नाही, असं सांगतानाच स्वातंत्र्य लढ्यात ज्यांचा कधीच सहभाग नव्हता, अशा मातृसंस्थांच्या पिल्लानी आम्हाला सावरकरांविषयी प्रश्न विचारू नये. पंतप्रधानांना भारतरत्न पुरस्कार देण्याचे अधिकार असतात. तरीही 8 वर्षात सावरकरांना भारतरत्न पुरस्कार का दिला नाही? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाला अभिवादन केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांवरील चित्रप्रदर्शनाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. सावरकरांचा मुद्दा उपस्थित केला हे बरं झालं. सावरकरांबद्दल आमच्या मनात प्रेम आहे. नितांत आदर आहे. ज्यांचा स्वातंत्र्य लढ्याशी संबंध नव्हता. अशा मातृसंस्थांच्या पिल्लांनी आम्हाला प्रश्न विचारावा हे दुर्देव आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
संघ स्वातंत्र्य लढ्यात नव्हता. संघाला आता 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यांचं स्वातंत्र्य लढ्यातील योगदान काय आहे? हे आधी सांगा. बाष्कळपणा बंद करा. आपल्या मातृसंस्थेचा स्वातंत्र्य लढयात भाग नव्हता त्यांनी आम्हाला प्रश्न विचारू नये. असं सांगतानाच निजामांच्या काळात हिंदूंवर अत्याचार होत होते. त्यावेळी तुमची मातृसंस्था कुठे होती? त्यांनी हिंदूंवरील किती अत्याचार थांबवले? असा सवालच त्यांनी केला.
तसेच पंतप्रधानांकडे भारतरत्न देण्याचे अधिकार असतात. मग गेली 8 वर्ष सावरकरांना भारतरत्न का दिला नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. राहुल गांधी यांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक होत आहे. त्यामुळे जिवंत अनुभव स्मारकात पाहता येणार आहे. त्याचं सादरीकरण झालं. व्यंगचित्रकार ही बाळासाहेबांची ओळख होती. बाळासाहेबांवरील चित्रं आणि व्यंगचित्रं असतील तर द्या, असं ते म्हणाले.
काही लोकांना बाळासाहेब समजायला दहा वर्ष लागली. बाळासाहेबांविषयी प्रेम आणि भावना व्यक्त केली पाहिजे. फक्त त्याचा बाजार करू नये. बाजारूपणा करू नये. कृती असावी. विचार असावा. बाजार कोणी मांडू नये. प्रेम श्रद्धा समजू शकतो. त्यांना साजेसं काम करावं, असा टोला त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नाव न घेता लगावला.