मुंबई : वर्षभरापूर्वी जे शिवसेनेत घडलं तेच आता राष्ट्रवादीत घडलं आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी काका शरद पवार यांना शह देत थेट भाजपची साथ धरली आहे. अजित पवार यांनी पक्षातच बंड केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. त्यामुळे राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. पक्षाच्या तब्बल 40 आमदारांनी शरद पवार यांची साथ सोडली आहे. त्यामुळे या आमदारांना परत आणण्यासाठी शरद पवार कामाला लागले आहेत. अजितदादांच्या बंडावर देशभरातून प्रतिक्रिया उमटत असतानाच दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून या फुटीवर भाष्य करत अजित पवार यांना फटकारे लगावण्यात आले आहेत.
महाराष्ट्रात भूकंप वगैरे काहीच झालेलं नाही. हा भूकंप होणार होता हे आधीच माहीत होतं. वर्षभरापूर्वी जे शिवसेनेत घडलं तेच राष्ट्रवादीबाबत घडलं आहे. अजितदादांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. यावेळी अजित पवार आणि भाजपमधील डिल पक्के झाले आहे. त्याचा फटका शिंदे गटाला अधिक बसणार आहे, असा दावा दैनिक सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.
अजित पवार हे आपल्या 40 आमदारांसह केवळ उपमुख्यमंत्रीपदासाठी भाजपसोबत गेले नाहीत. संवैधानिक तरतुदीनुसार शिंदे गटाचे लवकरच विसर्जन होणार आहे. त्यामुळे अजित पवार यांना मुख्यमंत्रीपद मिळेल. त्यांना सिंहासनावर बसवले जाईल. मात्र, या सगळ्यात देवेंद्र फडणवीस यांचा पोपट झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा भ्रष्टाचाऱ्यांचा पक्ष आहे. त्यांच्यासोबत आम्ही कदापी जाणार नाही, असं फडणवीस मान हलवत, मानेला झटके देत सांगत होते. त्याच फडणवीस यांचा या सर्वात पोपट झाला आहे, असा टोला सामनातून लगावण्यात आला आहे.
शेवटच्या श्वासापर्यंत राष्ट्रवादीतच राहील. स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ काय? असं अजित पवार म्हणत होते. तर राष्ट्रवादीशी युती कधीच करणार नाही, असं फडणवीस सांगत होते. पण दोघांनीही पलटी मारली. या पलटीमागे मिंधे गटाचाच घात झाला आहे. एकनाथ शिंदे आता कितीकाळ मुख्यमंत्री राहतील एवढाच काय तो प्रश्न आहे. ज्यावेळी अजित पवार शपथ घेत होते, तेव्हा शिंदे गटाच्या टोळीचे चेहरे काळे ठिक्कर पडले होते, असंही अग्रलेखातून म्हटलं आहे.
शरद पवार यांनी महिन्याभरापूर्वीच पक्षात भाकरी फिरवली. अजित पवार यांनी लगेच नवी चूल, नवा तवा आणून स्वत:ची भाकरी थापली. त्यामुळे शिंद्यांची भाकरी करपली आहे. भाजप आता शिंदे यांचे राजकारण अजित पवारांच्या चुलीत घालेल आणि शेकोटी घेत बसेल. महाराष्ट्राला लवकरच नवा मुख्यमंत्री मिळेल. तोही औटघटकेचाच ठरेल, असं सांगतानाच अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्रात भूकंप झाला नाही. फक्त थरथराट झाला आहे, असंही अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.