लाडली बहना फक्त मध्यप्रदेशापुरती आहे काय? मणिपूरसाठी नाही का?; उद्धव ठाकरे यांचा सवाल
आपल्यासाठी नाहीतर मुंबईसाठी मोर्चा काढायचा आहे. महाशक्ती नाही तर महाजनता दाखवायची आहे. आतापासून तयारीला लागा. मी स्वतः पूर्ण चालणार आहे. तिकडे जाऊन सांगा सहभागी व्हा. कोणी गुंडा गर्दी करत असेल तर त्यांना सांगा. मोर्चाचं नेतृत्व मी स्वत: करणार आहे. या मोर्चात सर्वांनी यायचं आहे. हा मुद्दा धारावीचा नाहीये. तर हा मुंबईचा मुद्दा आहे, असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
दिनेश दुखंडे, निवृत्ती बाबर, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 5 डिसेंबर 2023 : चार राज्यांपैकी तीन राज्यात भाजपचा विजय झाला आहे. तर एका राज्यात काँग्रेसचा विजय झाला आहे. काँग्रेसला तिन्ही मोठ्या राज्यात प्रचंड यश मिळालं आहे. त्यातही मध्यप्रदेशातील सत्ता राखण्यात भाजप यशस्वी ठरला आहे. मध्यप्रदेशात लाडली बहना ही योजना राबवल्यानेच भाजपला मोठं यश आलं असल्याची चर्चा आहे. मध्यप्रदेशच्या निकालानंतर भाजपच्या या योजनेचं देशभर कौतुक होत असतानाच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या योजनेवरून केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार्टी कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी मीडियाशी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांना लाडली बहना योजनेच्या अनुषंगाने प्रश्न विचारण्यात आले. त्यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. लाडली बहना ठिक आहे. पण गेल्यावर्षी मुंबईत अत्याचार वाढले त्याचं काय? लाडली बहना ही फक्त मध्यप्रदेशातच आहे का? त्याचा लाभ मणिपूरमध्ये का होत नाही? महाराष्ट्रात का होत नाही? बहीण ही बहीण असते. लाडली बहना मध्यप्रदेशात यशस्वी होत असेल तर मुंबईत का होत नाही? मुंबईत अत्याचार का होत आहेत? मग मुंबईतील महिला या बहना नाहीत का? असे सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केले.
दुसरा शब्द सांगा आता
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा रिपोर्ट आला आहे. त्यात महाराष्ट्रातील महिलांवरील अत्याचारात वाढ झाल्याचं म्हटलं आहे. याकडेही उद्धव ठाकरे यांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावर त्यांनी काय म्हटलं पाहिजे? म्हणायची गरज नाही. सरकार चालवायला नालायक आहे, असं मी म्हटलं होतं. दुसरा शब्द सांगा आता, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
ईव्हीएमवर निवडणुका घ्या
ईव्हीएमच्या मुद्द्यावरही उद्धव ठाकरे यांनी सवाल केले. ईव्हीएमचा विषय संपवून टाका एकदाचा. जेव्हा काँग्रेस जिंकून येत होती. तेव्हा तेच ईव्हीएमच्या विरोधात लढत होते. त्यांनी आम्हाला प्रेझेंटेन्शन दिलं होतं. ईव्हीएमचा संशय खोटा ठरवण्यासाठी एकदा बॅलेटपेपरवर निवडणुका घ्या, असं आव्हानच उद्धव ठाकरे यांनी दिलं.
मोर्चा होणार म्हणजे होणारच
अदानी आणि शरद पवार यांच्या मैत्रीवर उद्धव ठाकरे यांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली. शिवालय येथील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी हे भाष्य कलं. पवार साहेबांबदल मला पत्रकार परिषदेत विचारलं तर मी आताच सांगतो. माझ याबाबतीत घेणंदेणं नाही. याबाबतीत मी कोणाचं ऐकणार नाही. काही अयोग्य असेल तर आवाज उठवला पाहिजे. मोर्चा होणार म्हणजे होणारच, असंही त्यांनी ठणकावले.
रस्ते आमचे आहेत
या अगोदर अनेक मोर्चे काढले आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अनेक हुतात्म्यांनी बलिदान दिलं. लालबाग परळ हा धगधगता भाग होता. नेहरू होते तेव्हा मान वर करून बोलण्याची हिंमत नव्हती. तेव्हा चिंताराम देशमुख यांनी राजीनामा दिला होता. आताचे मिंधे सरकार त्यांची भांडी घासत आहे. आज मुंबईची कुतरओढ होत आहे. मुंबईला थेट तोडू शकत नाहीत म्हणून मुंबईचा विकास निती आयोगाच्या माध्यमातून करायचा, बिल्डरला कार्यालय द्यायचं असं सुरू आहे. तुम्ही मंत्रालयात बसले असाल पण मंत्रालयाच्या बाहेरचे आणि येणा जाण्याचे रस्ते आमचे आहेत, असा इशाराच त्यांनी दिला.