दिवस बदलतात हे फडणवीस यांनी लक्षात ठेवावं; उद्धव ठाकरे यांचा नेमका इशारा काय?
तपास यंत्रणा कशा वागतात यावर मला आणि संजयला बरंच बोलायचं आहे. आम्ही त्यावर वेळोवेळी बोलणार आहोत. कर नाही त्याला डर कशाला?
मुंबई: दिवस सतत बदलत असतात. तेही त्यात आहे. याचा अर्थ त्यांनी लक्षात ठेवला पाहिजे, असा इशारा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता दिला. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी हा इशारा दिला आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन मीडियाशी संवाद साधला.
उद्धव ठाकरे यांनी यावेळी संजय राऊत यांचं कौतुक केलं. संजय राऊतही शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ आहे. ती पुन्हा धडाडणार का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर तोफ ही तोफच असते. तोफ मैदानात आणावीच लागत नाही. या तोफेचा पल्ला सर्वांनाच माहीत आहे. काही लोक तोफ म्हणून आणतात आणि गोळी पायाजवळच पडते. पण ही आमची लांब पल्ल्याची तोफ आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
आमच्यासाठी संजय जिवलग मित्र आहे. तो आमच्या कुटुंबीयांपैकीच आहे. सुनीलचंही कौतुक आहे. संजयच्या आईचं, वहिनी आणि त्यांच्या मुलींचं कौतुक वाटतं. आम्ही सर्व कुटुंबासारखे आहोत. त्यामुळे धीर कुणी कुणाला द्यायचा हा प्रश्नच होता.
मध्यंतरी मी भावूक झालो होतो. मी संजयला तुरुंगात जाऊन भेटायलाही तयार होतो. आमच्यासाठी तो काळ खडतर होता. रोजचं काही काम असो वा नसो आमचं बोलणं व्हायचं. ते बोलणं बंद झालं होतं, असं भावूक उद्गारही त्यांनी काढले.
संजयने न डरता जिंकू शकतो हे दाखवून दिलं आहे. त्याने देशासमोर उदाहरण दिलं आहे. या तपास यंत्रणांच्या विरोधात आपचे लोकंही लढत आहेत. तेलंगणाच्या लोकांनी व्हिडीओच्या माध्यमातून प्रकरणच बाहेर आणलं आहे. सोरेन आणि ममता दीदींना छळलं जात आहे. हे सर्व एकत्र झाले तर किती मोठी ताकद उभी राहील, याची ताकद त्यांना माहीत नाही, असा हल्ला त्यांनी केंद्र सरकारवर चढवला.
तपास यंत्रणा कशा वागतात यावर मला आणि संजयला बरंच बोलायचं आहे. आम्ही त्यावर वेळोवेळी बोलणार आहोत. कर नाही त्याला डर कशाला? काही लोक घाबरून पक्षातून पळून गेले. त्यांनाही हा मोठा धडा आहे. न्यायालय निष्पक्षपातीपणे निर्णय देत आहे. ही चांगली गोष्ट आहे, असं त्यांनी सांगितलं.