Udhav Thackeray: ‘दिवस फिरतात, भाजपनं विचार करावा’, नड्डांच्या शिवसेना संपतेयला उद्धव ठाकरेंचं थेट उत्तर
'भाजप सोबत लढणारा आज कोणताच राजकीय पक्ष शिल्लक नाही. कोणताच विचार राष्ट्रीय स्तरावर नाही, इतर संपले. जे संपले नाहीत ते संपतील. फक्त आपणच टिकणार हे वक्तव्य देशाला हुकूमशाहीकडे नेणारे आहेत'.
मुंबई : देशातील सर्व पक्ष संपणार, फक्त भाजपच राहणार, असं वक्तव्य भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांनी केलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अटकेनंतर नड्डा यांचं हे वक्तव्य आल्यानं राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आलं आहे. अशावेळी आज शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नड्डांना थेट उत्तर दिलंय. ‘भाजप सोबत लढणारा आज कोणताच राजकीय पक्ष शिल्लक नाही. कोणताच विचार राष्ट्रीय स्तरावर नाही, इतर संपले. जे संपले नाहीत ते संपतील. फक्त आपणच टिकणार हे वक्तव्य देशाला हुकूमशाहीकडे नेणारे आहेत. महाराष्ट्रात शिवसेना संपणार म्हणतात, पण हे त्यांनी करूनच पाहावं, असं थेट आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिलंय.
‘आजचं त्यांचं राजकारण निर्घृण आणि घृणास्पद’
उद्धव ठाकरे म्हणाले की, सर्वच लोकांनी आता डोळे उघडून पाहायला पाहिजे. जिथे नेऊ इच्छितात तिथे नेऊ द्या. त्यात मदत करायची की नाही हे सामान्य नागरिकांनी ठरवायची वेळ आली आहे. भाजपसोबत लढणारा आज कोणताच राजकीय पक्ष नाही. कोणताच विचार राष्ट्रीय स्तरावर नाही, इतर संपले. जे संपले नाहीत ते संपतील. फक्त आपणच टिकणार हे वक्तव्य देशाला हुकूमशाहीकडे नेणारे आहे. महाराष्ट्रात शिवसेना संपणार म्हणतात, हे त्यांनी करूनच पाहावं. भाजपचा वंश कुठून सुरू झाला हे पाहायचं आहे. इतर पक्षातील लोक त्यांच्याकडे येत आहे. तर भाजपचा वंश कोणता आहे. आजचं त्यांचं राजकारण निर्घृण आणि घृणास्पद आहे. जे येतील ते आपले हे राजकारणात मी समजू शकतो. केवळ सोबत येतील ते, नाही तर जे गुलाम होतील ते काही काळ आपले. काम संपल्यावर नवीन गुलाम येतील, हे गुलाम जातील. गुलामगिरीकडे वाटचाल आहे. त्याचा निषेध केला पाहिजे, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधलाय.
‘दिवस सर्वदा सारखे नसतात, दिवस फिरतात’
संजय राऊतांच्या अटकेवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, राऊतांबद्दल मला अभिमान आहे. ज्या पद्धतीने नड्डा पक्ष वाढवत आहेत, ठीक आहे. राजकारण म्हटलं की त्याची बुद्धीबळाशी तुलना करतो. आजच्या राजकारणात बुद्धीचा नाही बळाचा वापर केला जात आहे. नुसते बळ तुमच्याकडे आहे. म्हणून तुम्ही इतरांना संपवण्याच्या मागे लागणार असला तर दिवस सर्वदा सारखे नसतात, दिवस फिरतात. दिवस फिरले तर याचा विचार नड्डा आणि भाजपने करावा, असा इशाराच ठाकरे यांनी दिलाय.