सर्वात मोठी बातमी… मोदी सरकारमध्ये पहिली ठिणगी?, मंत्रीपदावर लाथ मारण्याची भाषा; मित्र पक्षाने डोकं वर काढलं?
लोकजनशक्ती पार्टीचे नेते आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी मोदी सरकारला मोठा इशारा दिला आहे. झारखंड निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा इशारा दिला आहे. पासवान यांनी थेट मंत्रीपदावर लाथ मारण्याची भाषा केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
केंद्रात भाजपला बहुमत मिळालेलं नाही. त्यामुळे भाजपला मित्र पक्षांच्या मर्जीवरच चालावं लागणार आहे. जेव्हा मित्र पक्ष हात काढून घेतील तेव्हा केंद्रातील सरकार कोसळेल. मित्र पक्ष भाजपला स्वस्थ बसू देणार नाहीत. त्यांच्या आज ना उद्या कुरबुरी सुरू होतीलच, असा दावा विरोधकांकडून वारंवार केला जात होता. तो आता खरा ठरताना दिसतोय की काय अशी चिन्हे निर्माण झाली आहेत. केंद्रीय मंत्री आणि लोकजनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान यांनी एक मोठं विधान केलं आहे. मी माझे वडील (रामविलास पासवान) यांच्यासारखं मंत्रीपदाला लाथ मारून जाईल. मी माझ्या सिद्धांताशी तडजोड कदापिही करणार नाही, असं चिराग पासवान यांनी म्हटलं आहे. त्यामुळे चिराग यांचं हे विधान म्हणजे मोदी सरकारमधील पहिली ठिणगी आहे का? अशी चर्चा आता या निमित्ताने रंगू लागली आहे.
बिहारची राजधानी पटना येथे एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी चिराग पासवान यांनी हे विधान करून एकच खळबळ उडवून दिली आहे. चिराग यांच्या या विधानाचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहे. चिराग हे खरोखरच सरकारमधून बाहेर पडणार आहेत की कुणाला तरी इशारा देत आहेत, असा अर्थ या विधानाचा घेतला जात आहे. तसेच चिराग यांना पदरात आणखी काही पाडून घ्यायचं आहे का? की आपणही सरकारमध्ये किती महत्त्वाचे आहोत, आमचाही विचार घेतला पाहिजे, असं चिराग यांना सांगायचं आहे का? अशी चर्चाही या निमित्ताने होत आहे.
तर मंत्रिपद सोडेन
मी कोणत्याही आघाडीत असो वा मंत्रिपदावर असो जेव्हा संविधान आणि आरक्षणाच्या विरोधात कट कारस्थान होतंय असं मला वाटेल तेव्हा मी मंत्रीपदाला लाथ मारून निघून जाईल. माझ्या वडिलांनी जसं केलं होतं, तसंच मी करेन, असं चिराग पासवान म्हणाले.
सर्व पर्याय खुले…
झारखंडमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर चिराग यांचं हे विधान आलं आहे. त्यामुळे चिराग यांच्या विधानाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. चिराग यांनी झारखंड विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. आघाडी किंवा स्वबळावर ही निवडणूक करणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. आपल्याकडे सर्व पर्याय खुले असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.
लढणारच…
दरम्यान भाजप झारखंडची विधानसभा निवडणूक लढणार आहे. भाजप झारखंडमध्ये ऑल झारखंड स्टुडंट्स यूनियन आणि जेडीयू सोबत युती करून लढणार आहे. भाजप स्टुडंट यूनियला 11 जागा द्यायला तयार आहे, अशी माहिती मिळत आहे. या जागा वाटपाची लवकरच घोषणा होणार आहे. मात्र, या युतीत लोजपाचा समावेश होणार की नाही याचं चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
म्हणून निर्णय घेतला
लोकजनशक्ती पार्टीला मजबूत जनाधार आहे. त्यामुळे आपण राज्यातील इतर आघाड्यांशीही युती करण्याचा पर्याय ठेवला आहे. जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा झारखंड बिहारमध्येच होतं. झारखंड ही माझ्या वडिलांची कर्मभूमी होती. या राज्यात आमचा मोठा जनाधार आहे. त्यामुळेच निवडणुका लढण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे.