मॅनेजर म्हणाला, दानवेंना बोलवा, रावसाहेब म्हणाले, ‘अहो मीच तो’, 65 रुपयांच्या चेकच्या किस्स्याने मुख्यमंत्रीही खळखळून हसले!
मुख्यमंत्र्यांसमोर यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी तुफान फटकेबाजी केली. नेहमीप्रमाणे दानवेंनी आपल्या भाषणात किस्से आणि जुन्या प्रसंगाची पेरणी केली. दानवेंनी सांगितलेल्या प्रसंगावर उपस्थितांमध्ये खसखस पिकली.
औरंगाबाद : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलंय. दरम्यान, मुख्यमंत्र्यांसमोर यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी तुफान फटकेबाजी केली. 41 वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेचा सभापती असताना भत्तारुपी 65 रुपयांचा चेक कसा मिळाला याचा धमाल किस्सा रावसाहेब दानवे यांनी सांगितला. बँक अधिकाऱ्याने मला ओळखलं नाही. एवढा लहान सभापती असतो का?, असं बँक अधिकारी म्हणाले. शेवटी माझी ओळख करुन द्यावी लागली, असं दानवे यांनी सांगितलं. दानवेंनी सांगितलेल्या प्रसंगावर उपस्थितांमध्ये खसखस पिकली.
औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडलं. या कार्यक्रमाला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री सुभाष देसाई, अब्दुल सत्तार, खासदार इम्तियाज जलील उपस्थित होते. यावेळी नेहमीप्रमाणे दानवेंनी आपल्या भाषणात किस्से आणि जुन्या प्रसंगाची पेरणी केली.
दानवेंच्या 65 रुपयांच्या चेकचा किस्सा
दानवे म्हणाले, ग्रामीण विकासाची पाया म्हणजे जिल्हा परिषद आहे. मी या जिल्हा परिषदेचा सदस्य होतो. त्यावेळी भाजप नव्हता, जनता पक्ष होता, आणि नांगराच्या चिन्हावर मी निवडून आलो होतो. मला तेव्हा 65 रुपयांचा भत्त्याचा चेक मिळाला… मला चेक देताना मॅनेजर चेक देईना… ते मला ओळखेना, कारण मी सभापती असेन असं त्यांना वाटत नव्हतं, असा धमाल किस्सा दानवेंनी आपल्या भाषणात सांगितला.
त्यावेळी मंचावरचा एकही राजकारणात नव्हता
शालेय जीवनातच मी माझ्या राजकारणाची सुरुवात केली, असं सांगताना आता मंचावर बसलेले कुणीही त्याकाळी राजकारणात नव्हते, असं सांगायला दानवे विसरले नाहीत. तसंच यावेळी त्यांनी राज्याच्या आणि मराठवाड्याच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांना मदतीचं आवाहन केलं.
मुख्यमंत्र्यांसमोर सत्तारांना चिमटा
दानवे म्हणाले, मुंबई नागपूर बुलेट ट्रेनचं प्रेझेंटेशन आम्ही तयार केलं. फक्त 35 टक्के जमीन आम्हाला अधिक लागणार आहे. ते प्रेझेंटेशन घेऊन मी आपल्याला भेटणार आहे. सोलापूरपासून धुळ्यापर्यंत रेल्वे झाली नाहीतर रावसाहेब दानवे यांना मतदान करून नका असं अब्दुल सत्तार यांनी सांगितलं. मग मी पण म्हणालो सिलोड जिल्हा झाला नाही तर अब्दुल सत्तार यांना मतदान करू नका, अशी फटकेबाजीही दानवेंनी केली.
(Union State Minister Raosaheb Danve Anecdote RS 65 Cheque Cm Uddhav thacketay Visit Aurangabad marathwada Mukti Sangram Din)
हे ही वाचा :
LIVE : संत विद्यापीठ ते शिर्डी-औरंगाबाद हवाई प्रवास, मराठवाड्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या मोठ्या घोषणा