‘लालदिव्या’साठी प्रदेशाध्यक्षपद नाकारलं, त्यामुळेच नाथाभाऊंचं मुख्यमंत्रिपद गेलं; दानवेंचा गौप्यस्फोट
पक्षात एकेकाळी केवळ नाथाभाऊंकडेच लालदिव्याची गाडी होती. त्यावेळी त्यांना प्रदेशाध्यपदाची ऑफर देण्यात आली होती. पण तब्येतीचं कारण सांगून त्यांनी ते नाकारलं. भविष्यात सत्ता येईल की नाही, असं नाथाभाऊंना वाटलं. त्यामुळेच त्यांचं मुख्यमंत्रिपद गेलं असावं, असा गौप्यस्फोट भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी केला.
मुंबई: पक्षात एकेकाळी केवळ नाथाभाऊंकडेच लालदिव्याची गाडी होती. त्यावेळी त्यांना प्रदेशाध्यपदाची ऑफर देण्यात आली होती. पण तब्येतीचं कारण सांगून त्यांनी ते नाकारलं. भविष्यात सत्ता येईल की नाही, असं नाथाभाऊंना वाटलं. त्यामुळेच त्यांचं मुख्यमंत्रिपद गेलं असावं, असा गौप्यस्फोट भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी केला. (Union State Minister Raosaheb Danve reaction to Khadses resignation)
रावसाहेब दानवे यांनी आज ‘टीव्ही9 मराठी’शी एक्सक्युझिव्ह संवाद साधताना हा गौप्यस्फोट केला. नाथाभाऊ भाजप सोडून का गेले याला अनेक कारणे आहेत. कुठून सुरुवात करावी हा प्रश्न आहे. एकेकाळी भाजपमध्ये केवळ नाथाभाऊंकडेच लालदिव्याची गाडी होती. त्यांना पक्षाने प्रदेशाध्यक्षपद स्वीकारण्याचे आदेश दिले होते. पण भाजपची सत्ता येईल की नाही याची शंका असल्याने नाथाभाऊंनी तब्येतीचं कारण देत लालदिव्यासाठी प्रदेशाध्यक्षपद सोडलं. त्यामुळे हे पद देवेंद्र फडणवीसांकडे आलं. भाजपमध्ये प्रदेशाध्यक्षालाच मुख्यमंत्री केलं जातं. त्यामुळे फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्याकाळात खडसेंनी पक्षाचं अध्यक्षपद स्वीकारलं असतं तर कदाचित त्यांना मुख्यमंत्रिपदावर दावा करता आला असता, असा गौप्यस्फोट दानवे यांनी केला.
मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने खडसे नाराज झाले होते. पण त्यांच्याकडे अर्ध्याहून अधिक महत्त्वाची खाती देण्यात आली. तरीही ते नाराज होते. त्यांनी फडणवीस सरकारशी जुळवून घेतले नाही. त्यांचे सरकारसोबत संबंध सुधारतील असं वाटत नव्हतं. नंतरच सर्व तुम्हाला माहीतच आहे, असं ते म्हणाले.
उत्तर महाराष्ट्रात सामान्य कार्यकर्ताच पक्ष पुढे नेईल
नाथाभाऊ माझे जुने मित्र आहेत. त्यांच्यापेक्षा पक्षात मी सीनियर आहे. मी नाथाभाऊंच्या घरी आणि शेतातही जायचो. तेही माझ्या घरी यायचे. आमचे घरगुती संबंध आहेत. नाथाभाऊ दुसऱ्या पक्षात गेल्याचं दु:ख आहे. पण कोणतीही पोकळी निसर्गाला मान्य नसते. नेहरूनंतर पुढे कोण? असा प्रश्न होता. वाजपेयी-अडवाणींनंतर पुढे कोण? असाही प्रश्न होताच पण निसर्गाला पोकळी मान्य नसते या न्यायाने पर्याय मिळत गेले. उत्तर महाराष्ट्रात आमचं मोठं नेटवर्क आहे. गावागावात कार्यकर्ते आहेत. हे सामान्य कार्यकर्तेच पक्ष पुढे नेतील, असं सांगतानाच आम्हाला उत्तर महाराष्ट्राची चिंता नाही, तर नाथाभाऊ गेले याची चिंता आहे, असंही दानवे म्हणाले. भाजपचा एकही आमदार, पदाधिकारी खडसेंसोबत जाणार नाही, असा दावाही त्यांनी केला.
ते आज ना उद्या निर्णय घेतील याची जाणीव होती
राजकारणात पक्ष सोडण्याच्या घटना घडत असतात. अनेक नेते अनेक वर्षे पक्षात राहून नंतर पक्ष सोडतात. नाथाभाऊंनी सत्ता भोगली. पदं भोगली आणि 40 वर्षानंतर पक्ष सोडला. त्यांनी पक्ष सोडू नये असं वाटत होतं. त्यांच्या मनातली खदखद सर्वांनाच माहीत होती. ते आज ना उद्या निर्णय घेतील असंही वाटत होतं. त्यामुळे त्यांचं अनेकदा मन वळवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी ज्यांच्यावर आरोप केले त्यांच्याच पक्षात जाण्याची त्यांच्यावर वेळ आली, असा टोलाही त्यांनी लगावला.
‘वाजपेयी-अडवाणी नसल्यानेही भाजप पक्ष थांबला नाही; नाथाभाऊ जाण्यानेही थांबणार नाही’ https://t.co/bFFxo29KGa #EknathKhadse @raosahebdanve @BJP4Maharashtra @NCPspeaks #Maharashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 23, 2020
संबंधित बातम्या:
‘त्यांनी खडसेंना न्याय दिला नाही, मग तुमची काय गत होईल? आमच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चला’
एकट्या फडणवीसांमुळं पक्ष चालत नाही, भाजपमध्ये कुठलाही निर्णय सामूहिकरित्या- दानवे