UPA Meeting : ममता बॅनर्जी यांची समजूत काढली जाणार, जबाबदारी शरद पवारांकडे?
दिल्लीत आज झालेल्या विरोधकांच्या बैठकीला सोनिया गांधी, शरद पवार, सीताराम येचुरी, फारुक अब्दुल्ला, डीएमकेचे टी आर बालू, शिवसेनेकडून संजय राऊत आदी उपस्थित होते. यावेळी काँग्रेसला वगळून विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न करणाऱ्या ममता बॅनर्जी यांची समजूत काढण्याबाबत चर्चा झाली. ही जबाबदारी शरद पवार यांच्या खांद्यावर देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
नवी दिल्ली : भाजपविरोधात काँग्रेससह सर्वच विरोधी पक्ष आता अधिक आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं भाजपविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. तर दुसरीकडे आज राजधानी दिल्लीत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या 10 जनपथवरील निवासस्थानी UPA ची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राजकीय स्थितीबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. त्याचबरोबर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांची समजूत काढण्याबाबतही चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. महत्वाची बाब म्हणजे ममता बॅनर्जी यांची समजूत काढण्याची जबाबदारी ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
दिल्लीत आज झालेल्या विरोधकांच्या बैठकीला सोनिया गांधी, शरद पवार, सीताराम येचुरी, फारुक अब्दुल्ला, डीएमकेचे टी आर बालू, शिवसेनेकडून संजय राऊत आदी उपस्थित होते. यावेळी काँग्रेसला वगळून विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न करणाऱ्या ममता बॅनर्जी यांची समजूत काढण्याबाबत चर्चा झाली. ही जबाबदारी शरद पवार यांच्या खांद्यावर देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेसशिवाय विरोधी पक्षांच्या ऐक्याला या बैठकीतीली नेत्यांनी सहमती दर्शवली नसल्याचं कळतंय. त्याचबरोबर भाजप विरोधात लढण्यासाठी राज्यनिहाय व्यूहरचना आखण्याबाबतही या नेत्यांमध्ये सहमती झाल्याचं कळतं.
ममता बॅनर्जींकडून मुंबई दौऱ्यात यूपीएवर प्रश्नचिन्ह
ममता बॅनर्जी या नुकत्याच मुंबई दौऱ्यावर येऊन गेल्या. या दौऱ्यात त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांची भेट घेतली होती. त्यावेळी माध्यमांशी बोलताना बॅनर्जी यांनी पवारांसमोरच राहुल गांधी यांच्याव जोरदार टीका केली होती. तसंच यूपीए कुठे आहे? असा सवालही केला होता. बॅनर्जींच्या या बैठकीनंतर यूपीएबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. त्यानंतर आज दिल्लीत झालेल्या बैठकीत ममता बॅनर्जी यांची समजूत काढण्याबाबत महत्वाची चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.
‘राजकीय स्वरुपाची बैठक असली तरी काही गोष्टी सांगता येत नाहीत’
दरम्यान, आजची बैठक ही पूर्वनियोजित होती. ही बैठक बंद दाराआड होती. राजकीय स्वरुपाची बैठक असली तरी अनेक गोष्टी अशा असतात ज्या सांगता येत नाहीत. पुढे काय करता येईल, काय रणनिती ठरवता येईल, याबाबत आम्ही बोललो. शिवसेनेच्या वतीनं मी उपस्थित होतो. खरं म्हणजे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण दिलं होतं. उद्धवजींनी यावं असा त्यांचा आग्रह होता. पण उद्धवजी सध्या प्रवास करु शकत नाहीत, त्यामुळे त्यांनी मला जाण्यास सांगितलं होतं, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी या बैठकीनंतर दिली आहे.
इतर बातम्या :