पाटणा (बिहार) : बिहारमधील महागठबंधनमध्ये माजी केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह यांची राष्ट्रीय लोक समता पार्टी (रालोसपा) सुद्धा सामिल झाली आहे. जागावाटपावरुन महागठबंधनमध्ये मोठी चर्चा, ओढाताण झाल्यानंतर, उपेंद्र कुशवाह यांच्या पक्षाच्या वाट्याला पाच जागा आल्या. या पाचही जागांवरील उमेदवार उपेंद्र कुशावह यांनी जाहीरही केले. विशेष म्हणजे, या पाचपैकी काराकाट आणि उजियारपूर या दोन जागांवर कुशावाह यांनी स्वत:चीच उमेदवारी जाहीर केली आहे.
महागठबंधनमध्ये एका-एका जागेसाठी प्रचंड ओढाताण झाल्याची चर्चा बिहारच्या राजकारणात रंगते आहे. अशात महागठबंधनमध्ये नव्याने सामिल झालेल्या राष्ट्रीय लोक समता पार्टीला पाच जागा मिळाल्या. या पाच जागांसाठी पार्टीचे प्रमुख आणि माजी केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह यांना मोठी ओढाताण करावी लागल्याची चर्चा आहे.
दोन जागांवर लढण्यासाठी कार्यकर्त्यांचा आपल्यावर दबाव असल्याचा दावा उपेंद्र कुशवाह यांनी केला आहे.
उपेंद्र कुशवाह ज्या दोन जागांवर लढत आहेत, त्यातील एका जागेवर त्यांना जदयू आणि दुसऱ्या जागेवर भाजपच्या उमेदवाराचा सामना करावा लागणार आहे. यावर बोलताना कुशवाह म्हणाले, “जदयू आणि भाजपला धडा शिकवायचा आहे. या दोन्ही पक्षांनी मला बरबाद करण्याचा विडा उचलला आहे. दोन्ही जागांवर जदयू आणि भाजपला पराभूत करेन.“
महागठबंधनमध्ये सामिल झालेल्या रालोसपा बिहारमध्ये एकूण पाच जागांवर निवडणूक लढत आहे. त्यातील काराकाट आणि उजियारपूर या दोन जागांवर स्वत: उपेंद्र कुशवाह उभे राहणार आहेत, तर पश्चिम चंपारणमधून ब्रजेश कुशवाह आणि पूर्व चंपारणमधून आकाश कुमार सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आकाश कुमार सिंह हे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार अखिलेश कुमार सिंह यांचे सुपुत्र आहेत. तसेच, जुमई लोकसभा मतदारसंघातून भूदेव चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.