शिंदे गटातील प्रवेशाच्या चर्चा, वैभव नाईकांनी अखेर विषय मिटवला; थेट सांगूनच टाकलं, म्हणाले…
वैभव नाईक आमच्यासोबत आले तर निलेश राणे त्यांचं स्वागतच करतील, असं उदय सामंत म्हणाले होते. त्यानंतर नाईक यांच्या पक्षबदलाच्या चर्चांना उधाण आलं होतं.

Vaibhav Naik Vs Narayan Rane : राज्याच्या राजकारणात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. एकीकडे मनसे आणि शिंदे यांच्या शिवसेना यांच्या युतीसाठी प्रयत्न केले जात आहेत. शिंदे गटाचे नेते तथा मंत्री उदय सामंत हे विशेष रुपाने प्रयत्न करत असल्याचं दिसतंय. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनीदेखील राज ठाकरे यांच्यासाठी आम्ही युती करायला तयार आहोत, असे अप्रत्यक्षपणे सांगितले आहे. या चर्चा एकीकडे चालू असताना दुसरीकडे काही नेत्यांच्या पक्षबदलाच्याही अनेक चर्चा रंगल्या आहेत. वैभव नाईक आमच्यासोबत आले तर निलेश राणे त्यांचं स्वागतच करतील, असं उदय सामंत म्हणाले होते. त्यानंतर नाईक यांच्या पक्षबदलाच्या चर्चांना उधाण आलं होतं. असं असतानाच आता पक्षबदलाच्या चर्चेवर खुद्द वैभव नाईक यांनीच प्रतिक्रिया दिली आहे.
ते स्वत:च्या मुलासाठी कितीवेळा…
मुंबईत असताना वैभव नाईक यांनी याबाबत सविस्तर भूमिका मांडली आहे. “मी कायम उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहमार आहे. माझ्याविषयी बोलण्याचा नारायण राणे यांना अधिकार नाही. जे राणे माझ्याविषयी बोलत आहेत, ते स्वत:च्या मुलासाठी कितीवेळा वर्षा बंगल्याबाहेर उभे होते, हे सर्वांना माहिती आहे,” अशी घणाघाती टीका वैभव नाईक यांनी केली आहे.
अडीच वर्षांत मी एकदाही…
मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा उदय सामंत यांना अडीच वर्षांत एकदाही भेटलो नाही. ज्या-ज्या वेळी सत्ताबदल झाला, त्या-त्या वेळी नारायण राणे यांनी त्यांची भूमिका बदलली आहे,” असा हल्लाबोल त्यांनी केला. सोबतच उदय सामंत हे माझे मित्र आहेतच. पण मी सत्तेसाठी हापापलेला नाही, असं रोखठोक विधान त्यांनी केलंय.
नारायण राणे नेमकं काय म्हणाले होते?
वैभव नाईक हे शिंदे यांच्या शिवसेनेत आल्यास भाजपाचे नेते निलेश राणे त्याचं स्वागतच करतील, असं विधान उदय सामंत यांनी केलं होतं. त्यांच्या याच विधानावर भाजपाचे नेते तथा सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली होती. उदय सामंत हे आमचे सल्लागार नाहीत, असा टोला त्यांनी लगावला होता. मी परवानगी दिल्याशिवाय काहीही होऊ शकत नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना वैभव नाईक हे मला घ्या म्हणत बाहेर असलेले असायचे. वैभव नाईक माझ्याबद्दल काहीही बोलतात. त्यांची माझ्याबद्दल बोलायची लायकी आहे का? असा संताप त्यांनी व्यक्त केला होता. त्यांच्या याच विधानावर वैभव नाईक यांनी हल्लाबोल केला आहे.