Dhananjay Munde : सरपंचाची निर्घृण हत्या, वाल्मिक कराडशी संबंध, अखेर धनंजय मुंडेंनी दिलं स्पष्टीकरण
Dhananjay Munde : सध्या राज्यभरात सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण गाजत आहे. अत्यंत निदर्यतेने संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणात वाल्मिक कराडमुळे धनंजय मुंडे यांचं नाव येत आहे. आज धनंजय मुंडे यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख निर्घृण हत्या प्रकरण सध्या राज्यभरात गाजत आहे. या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांचं नाव आल्याने धनंजय मुंडे अडचणीत आले आहेत. कारण वाल्मिक कराड हे धनजंय मुंडे यांच्या जवळचे मानले जातात. आज अखेर या विषयावर सभागृहाबाहेर धनंजय मुंडे पत्रकारांशी बोलले. “त्यांच्या सख्ख्या भावाने धनंजय देशमुख यांनी स्वत: स्टेटमेंट केलं आहे. ते स्टेटमेंट केल्यानंतर अशा अतिशय घाणेरड्या घटनेत माझा संबंध लावणं म्हणजे यांना कुठेतरी राजकारण आणायच आहे. मूळात आता हा विषय सभागृहात आणला. आदरणीय मुख्यमंत्री स्वत: यावर बोलणार आहेत. ही घटना का झाली? कशी झाली? याला काय कारण आहे? कोण जबाबदार आहे? काय चौकशी झाली? किती आरोपींना अटक झाली? याबाबत मुख्यमंत्री स्वत: बोलणार आहेत, तो पर्यंत थांबा” असं धनंजय मुंडे म्हणाले.
वाल्मिक कराड यांच्यासोबत फोटो व्हायरल होतोय, त्यावर धनंजय मुंडे म्हणाले की, “बीड जिल्ह्यातून अनेक जण येतात, फोटो काढतात. त्यामुळेच मला आज दीड तास उशिर झाला. त्यांना आमच्यासोबत फोटो काढायचा असतो, आम्हाला तो द्यायचा असतो. ते त्या फोटोच व्यक्तीगत जीवनात काय करतात? याचा संबंध आमच्याशी येत नाही” असं धनंजय मुंडे म्हणाले. “अशा घाणेरड्या प्रवृत्तीला, खून करणाऱ्या लोकांना आम्ही मदत करतोय, पाठबळ देतोय असं कधी जमलं नाही. आजपर्यंत राजकारणात, समाजकारणात इतक्या वर्षात असं कधी केलेलं नाही” असं धनंजय मुंडे म्हणाले.
‘हे मी हाऊसचा अपमान केल्यासारख’
“या प्रकरणात कारवाई पहिल्या दिवशी झाली. चार आरोपींना अटक झाली. पोलिसांच्या आठ टीम तयार करण्यात आल्या आहेत. आरोपींना अटक होईल. मी या विषयी जास्त बोलण्यापेक्षा आदरणीय मुख्यमंत्री जे गृहमंत्री आहेत, ते स्वत:च निवेदन करणार आहेत. त्यामुळे मी हाऊसच्या बाहेर बोलणं हे मी हाऊसचा अपमान केल्यासारख आहे” असं धनंजय मुंडे म्हणाले.