Prakash Ambedkar | ‘अफवा पसरवण्यात…’, प्रकाश आंबेडकर यांचा नवीन वर्षातील संकल्प काय?
Prakash Ambedkar | आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांसोबत झालेल्या भेटीवर उत्तर दिलं. प्रकाश आंबेडकर हे नेहमीच शरद पवार यांच्यावर बोचरी टीका करायचे. पण अलीकडे त्यांचे सूर बदलले आहेत.
योगेश बोरसे
पुणे : वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत स्थान मिळणार का? या बद्दल सध्या विविध तर्क-वितर्क लढवले जात आहेत. प्रकाश आंबेडकर हे नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर बोचरी टीका करायचे. पण अलीकडे त्यांचे सूर बदलले आहेत. अलीकडेच पुण्यात प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांची भेट झाल्याची चर्चा होती. वंचितच्या समावेशाने महाविकास आघाडी अधिक भक्कम होईल, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांसोबत झालेल्या भेटीवर उत्तर दिलं. “आता आम्ही एकत्र येणारच आहोत. त्यामुळे भेटी होणार आहेत. एखाद्या भेटीविषयी स्पेक्युलेशन करायला नको. आम्ही एकत्र येणार आहोत त्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसही आहे. त्यामुळे शरद पवार यांचीही भेट होत राहणार आहे” असं प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याच्या प्रश्नावर उत्तर दिलं.
“इंडिया आघाडीमध्ये आमचा समावेश कधी होणार आहे? हे त्यांनीच ठरवायचे आहे. तेच तुम्हाला सांगतील, आमचा सहभाग कधी होणार?” इंडिया आघाडीतील सहभागावर प्रकाश आंबेडकर यांनी हे उत्तर दिलं. इंडिया आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला सामील करण्याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. याबाबत प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली असल्याच सांगितल जात आहे.
‘अफवा पसरवण्यात काहीही अर्थ नाही’
याबाबत आंबेडकर यांना विचारलं असता ते म्हणाले की “आम्ही एकत्र येणारच आहोत.त्यामुळे कधी ना कधी औपचारिक, अनौपचारिक रित्या भेट होणारच आहे. त्यामुळे अफवा पसरवण्यात काहीही अर्थ नाही” “त्यांनी ठरवायचं आहे की, इंडिया आघाडीमध्ये आम्हाला कधी घेणार आहेत.आत्ता तरी आमच्यासाठी इंडिया आघाडीचे दारं बंद आहेत” असं आंबेडकर यावेळी म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांचा नवीन वर्षातील संकल्प काय?
प्रकाश आंबेडकर यांना नवीन वर्षाच्या संकल्पाबाबत विचारलं असता ते म्हणाले की “सत्तेत येणे, संविधान वाचवणे तसेच राज्याची शांतता हा आमचा यावर्षीचा संकल्प असणार आहे” राज्याच्या बाहेर आत्ता प्रकल्प जात आहेत, याबाबत आंबेडकर यांना विचारलं असता ते म्हणाले की “या देशाच्या पंतप्रधानांनी गेल्या 10 वर्षात देशाला कस खोकलं केलं आहे, याचा एक आराखडा मांडण्यात येणार आहे” अस देखील यावेळी आंबेडकर म्हणाले.