Video | संदीप देशपांडेंवरच्या हल्ल्याचं खरं कारण काय? ज्यांच्यावर संशय ते वरुण सरदेसाई म्हणाले…
संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय. यापैकी एकाला भांडुप परिसरातून ताब्यात घेण्यात आलंय.
रवी खरात, नवी मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep deshpande) यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. संदीप देशपांडे यांना भर शिवाजी पार्कमध्ये मारहाण करण्यात आली. यामागे राजकीय वैमनस्य आहे, असा दाट संशय मनसे आणि भाजप नेत्यांकडून व्यक्त केला जातोय. भाजप नेते नितेश राणे यांनी तर या मागे युवा सेना नेता वरुण सरदेसाई यांचा हात असू शकतो, असा संशय विधानसभेत बोलताना व्यक्त केला. संदीप देशपांडे यांनीदेखील आज पोलिसांकडे लेखी जबाब नोंदवला आहे. या प्रकरणी नेमका कुणावर संशय आहे, याची सविस्तर माहिती त्यांनी पोलिसांना दिली आहे. मात्र देशपांडे यांच्या हल्ल्यासाठी नेमके कोण जबाबदार आहेत, हा हल्ला का झाला, यावरून वरुण सरदेसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशा चिल्लर लोकांच्या बोलण्यावर प्रतिक्रिया द्यायला मला आवडत नाही, अशी फटकारही त्यांनी लगावली आहे.
‘चिल्लर लोकांवर बोलणार नाही’
युवा सेना नेता वरुण सरदेसाई म्हणाले, ‘ कोण काय बोलतं… एखादी व्यक्ती बोललल्यावर त्यावर फार रिअॅक्ट करावं असं मला वाटत नाही. अशा चिल्लर लोकांवरती बोलायला मला आवडत नाही. स्वतःच्या प्रसिद्धीकरिता , सिक्युरिटी मिळवण्याकरिता हे केलं असेल. आम्हाला आमचा पक्ष, संघटना वाढवण्यात स्वारस्य आहे…
‘पराभवावरून लक्ष्य विचलित करण्याचा प्रयत्न’
तर संदीप देशपांडे यांच्या हल्ल्यामागचं कारण सांगताना वरुण सरदेसाई म्हणाले, ‘ कसब्यात जे भाजपला हार पत्करावी लागली. त्या सगळ्यातून विषय डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न आहे. २८ वर्ष कसबा हा भाजपचा बालेकिल्ला होता. अगदी २५ ते ३० एवढे कमी आमदार असतानाही कसब्याची जनता भाजपसोबत उभी होती. पण आता कसब्याच्या जनतेने भाजपला नाकारलं आहे. कसबा हा निकाल देऊ शकतो तर येणाऱ्या विधानसभा-लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्राची जनता उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या मागे उभी राहील….
हल्ला प्रकरणी दोघे ताब्यात
संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय. यापैकी एकाला भांडुप परिसरातून ताब्यात घेण्यात आलंय. सदर व्यक्ती ठाकरे गटाच्या माथाडी कामगार सेनेचा उपाध्यक्ष असल्याची माहिती समोर आली आहे. संदीप देशपांडे यांनी व्यक्त केलेल्या संशयाच्या आधारेही पोलीस तपास सुरु आहे. या प्रकरणी लवकरच सविस्तर खुलासा होईल, अशी आशा संदीप देशपांडे यांनी व्यक्त केली आहे.