Vasant More Speech : ‘दादा, पंधरा वर्षे भाजपच्याच नगरसेवकाला पाडून नगरसेवक होतोय मी’, जेव्हा वसंत मोरेंनी चंद्रकांत पाटलांची ऑफर धूडकावली
आजच्या सभेत बोलताना वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांचं काम जनतेपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन केलंय. तसंच वसंत मोरे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलेली ऑफर आणि त्याला दिलेलं उत्तरही सांगितलं.
ठाणे : मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्याबाबत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी घेतलेल्या भूमिकेवरुन जाहीरपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर पुण्यातील नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर आज ठाण्यातील राज ठाकरे यांच्या उत्तरसभेलाही त्यांनी हजेरी लावली. राज ठाकरे यांच्या भेटीनंतर वसंत मोरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतच राहणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर आजच्या सभेत बोलताना वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांचं काम जनतेपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन केलंय. तसंच वसंत मोरे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिलेली ऑफर आणि त्याला दिलेलं उत्तरही सांगितलं.
मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावरुन नाराजीनाट्य पार पडल्यानंतर वसंत मोरे यांनी आज राज ठाकरे यांचे आभार मानले. तसंच या काळात मला अनेक पक्षांनी ऑफर दिल्याचं सांगितलं. तसंच चर्चेतील चेहरा म्हणून जेव्हा महापालिकेनं पुरस्कार दिला तेव्हा चंद्रकांत पाटील यांनीही भाजप प्रवेशाची ऑफर दिली होती, असं वसंत मोरेंनी सांगितलं. वसंत मोरे म्हणाले की, ‘मला पुरस्कार देताना चंद्रकांतदादा आणि सुप्रिया सुळे होत्या. तेव्हा चंद्रकांतदादा म्हणाले तुम्ही भाजपमध्ये या. तेव्हा मी दादांना म्हणालो मी 15 वर्षे भाजपच्याच उमेदवाराला पाडून नगरसेवक होत आलोय’.
ठाण्यातील ‘उत्तरसभे’त वसंत मोरेंचं भाषण
उत्तरसभा । राजसाहेब ठाकरे ठाणे येथून लाईव्ह.. https://t.co/j36KyrtKin
— Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) April 12, 2022
‘एक एम्बेसेडरची काच फुटली आणि त्याचा आवाज महाराष्ट्राने ऐकला’
पुण्यात कोरोना काळात सरकारच्या माध्यमातून जी काम होणं अपेक्षित होतं ती कामं झाली नाहीत. त्यावेळी फक्त मनसे काम करत होती. तुम्ही त्या गोष्टी उघड्या डोळ्यांनी पाहिली आहेत. सगळे नेते आपल्या घरात बसलेले असताना मनसे पदाधिकारी रस्त्यावर होते. एक एम्बेसेडरची काच फुटली आणि त्याचा आवाज सगळ्या महाराष्ट्राने ऐकला. ज्या ठिकाणी ऑक्सिजनची गरज होती तिथे आमचा मनसैनिक जात होता. सरकार जी कामं करत नव्हते ती कामं आम्ही करत होतो. आमचा साईनाथ 5 – 5 हजार लोकांना जेवण देत होता. आम्ही दवाखाने उभे केले. 16 वर्षात 16 उद्यानं निर्माण करणारा मी एकमेव नगरसेवक आहे.
‘निवडणुकीच्या काळात मनसे का आठवत नाही?’
कोरोनाचा ट्रेन्ड बदलत गेला तसा फायनान्स, बँकवाले प्रत्येकाच्या दारात उभे राहायला लागले. अशावेळी फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची दारं उघडी होती. फायनान्सवाला, बँकवाला आला की मनसेवाला आठवतो, मग निवडणुकीच्या काळात मनसे का आठवत नाही?
राज साहेब आजार होते तरीही…
गेल्या दोन तीन महिन्यात राज साहेबांच्या तब्येत अडचणी सुरु आहेत. कालही त्यांना होणारा त्रास मला जाणवत होता. आम्ही सगळ्यांनी पाहिलं आहे की एक पायरी चढणं मुश्किल होतं तिथे ते 10 पायऱ्या चढून कार्यकर्त्याच्या घरी जात होते. राजसाहेबांच्या ब्लू प्रिंटचं काम पाहायलं असेल तर कात्रज आणि कोंढव्यात या. पुणे महापालिकेत आम्ही दोनच नगरसेवक आहोत. तरीही चर्चेतील चेहरा हा पुरस्कार मनसेच्या नगरसेवकाला जातो. म्हणजे मनसे नक्कीच चांगलं काम करत आहे.
इतर बातम्या :