Video: मंत्री भागवत कराडांची सगळी भीस्त गोपीनाथ मुंडेंच्याच पुण्याईवर? का म्हणतायत ‘आमचं काळीज’?
भागवत कराड यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या यात्रेची घोषणा केली आहे. "भव्य जन आशिर्वाद यात्रा... दि. १६ ते २१ ऑगस्ट, २०२१, मुंडे साहेबांचा आशिर्वाद व जनतेचा पाठिंब्या मुळेच आज इथवर पोहोचलो, येत आहे जनतेचा आशिर्वाद घ्यायला", असं ट्वीट भागवत कराड यांनी केलंय. त्यावेळी त्यांनी भाजपचे नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या फोटोंचा एक व्हिडीओही शेअर केला आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील नवनिर्वाचित केंद्रीय मंत्र्यांची जनआशीर्वाद यात्रा 16 ऑगस्टपासून राज्यभरात निघणार आहे. राजधानी दिल्लीत पार पडलेल्या भाजप नेत्यांच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांची जनआशीर्वाद यात्रा गोपीनाथ गडावरुन सुरु होणार आहे. तशी घोषणाच कराड यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. महत्वाची बाब म्हणजे कराड यांच्या यात्रेला भाजप नेत्या पंकजा मुंडे हिरवा झेंडा दाखवणार आहेत. कराड यांची ही यात्रा बीड, औरंगाबाद, नांदेड, परभणी आणि जालना या जिल्ह्यांचा प्रवास करणार आहे. (Announcement of Bhagwat Karad’s Jana Aashirwad Yatra)
भागवत कराड यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या यात्रेची घोषणा केली आहे. “भव्य जन आशिर्वाद यात्रा… दि. १६ ते २१ ऑगस्ट, २०२१, मुंडे साहेबांचा आशिर्वाद व जनतेचा पाठिंब्या मुळेच आज इथवर पोहोचलो, येत आहे जनतेचा आशिर्वाद घ्यायला”, असं ट्वीट भागवत कराड यांनी केलंय. त्यावेळी त्यांनी भाजपचे नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या फोटोंचा एक व्हिडीओही शेअर केला आहे. त्यात गोपीनाथ मुंडे यांना त्यांनी ‘आमचं काळीज’ असं म्हटलंय. भागवत कराड आज केंद्रीय राज्यमंत्रीपदी विराजमान झाले असतील तर त्यामागे गोपीनाथ मुंडे यांची पुण्याई असल्याचं लोक म्हणतात.
भव्य जन आशिर्वाद यात्रा दि. १६ ते २१ ऑगस्ट, २०२१ मुंडे साहेबांचा आशिर्वाद व जनतेचा पाठिंब्या मुळेच आज इथवर पोहोचलो येत आहे जनतेचा आशिर्वाद घ्यायला pic.twitter.com/czgOJ16Ncv
— Dr Bhagwat Kishanrao Karad (@DrBhagwatKarad) August 14, 2021
गोपीनाथ मुंडेंनी कराडांना राजकारणात आणलं
भागवत कराड यांना भाजपनं राज्यसभेवर संधी दिली. त्यापाठोपाठ आता त्यांच्यावर केंद्रीय अर्थ राज्यमंत्रीपदाची जबाबदारी देत भाजपच्या केंद्रीय आणि राज्यातील नेतृत्वाने मोठा विश्वास टाकला आहे. कराड हे पेशाने डॉक्टर आहेत. औरंगाबादेतील नूतर कॉलनीमध्ये त्यांचं ‘कराड हॉस्पिटल’ होतं. त्यांचं शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठात झालं आहे.
भागवत कराड यांचा मुळचा पिंड राजकारणाचा नव्हता. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी त्यांना राजकारणात आणलं. त्यानंतर ते औरंगाबादचे दोनवेळा महापौरही झाली. गोपीनाथ मुंडे यांचे विश्वासू सहकारी म्हणून भागवत कराड यांची ओळख होती. तसंच गोपीनाथ मुंडे हे आपले नेते होते आणि आज पंकजा मुंडे आहेत, असं कराड यांनी मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर ट्वीट केलं होतं.
भागवत कराड कोण आहेत?
-1995 ते 2009 या कालावधीत औरंगाबाद महापालिकेत तीन वेळा नगरसेवक -1997 ते 1998 औरंगाबादचे उपमहापौर -2000 ते 2001 आणि 2006 ते 2007 औरंगाबादचे महापौर -2009 मध्ये औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी
डॉ. भागवत किशनराव कराड यांचा जन्म लातूर जिल्ह्यातील चिखली गावात झाला. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या कराड यांचे दहावीपर्यंतचे जिल्हा परिषद शाळेत झाले. अहमदपूरच्या महात्मा गांधी महाविद्यालयातून त्यांनी प्री-मेडिकलचे शिक्षण पूर्ण केले. औरंगाबादच्या वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस आणि एम.एस. (जनरल सर्जरी) ही पदवी संपादन केली. एमएस. शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबई विद्यापीठातील वैद्यकीय क्षेत्रातील अती उच्च एम.सीएच (पेडियाट्रीक) ही मिळवली. मराठवाड्यातील अशा प्रकारची पदवी घेणारे वैद्यकीय क्षेत्रातील पहिले डॉक्टर असल्याचा भागवत कराड यांचा दावा आहे.
इतर बातम्या :
‘ओबीसींचं आरक्षण वाचवा, अन्यथा उद्रेक होईल’, पंकजा मुंडेंचा महाविकास आघाडी सरकारला इशारा
Announcement of Bhagwat Karad’s Jana Aashirwad Yatra