Video : ‘आता मी तो गाल सोडला आणि ओम पुरीचा गाल पकडला’, गुलाबराव पाटल्यांच्या वक्तव्यानं उपस्थितांमध्ये हशा
गुलाबराव पाटील यांनी आपल्या मतदारसंघातील रस्त्यांची तुलना थेट ज्येष्ठ अभिनेत्री आणि भाजप खासदार हेमा मालिनी (Hema Malini) यांच्या गालाशी केली होती. त्यानंतर पाटील यांच्यावर सर्व स्तरातून जोरदार टीका झाल्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्याबाबत दिलगिरीही व्यक्त केली होती. त्यानंतर आता गुलाबरावर पाटील यांनी आता आपण 'तो' गाल सोडला आणि ओम पुरीचा गाल पकल्याचं वक्तव्य केलं आहे.
जळगाव : नगर पंचायत निवडणुकीदरम्यान शिवसेनेचे नेते आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना डिवचताना एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. पाटील यांनी आपल्या मतदारसंघातील रस्त्यांची तुलना थेट ज्येष्ठ अभिनेत्री आणि भाजप खासदार हेमा मालिनी (Hema Malini) यांच्या गालाशी केली होती. त्यानंतर पाटील यांच्यावर सर्व स्तरातून जोरदार टीका झाल्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्याबाबत दिलगिरीही व्यक्त केली होती. त्यानंतर आता गुलाबरावर पाटील यांनी आता आपण ‘तो’ गाल सोडला आणि ओम पुरीचा गाल पकल्याचं वक्तव्य केलं आहे. पाटील यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला.
काय म्हणाले गुलाबराव पाटील?
‘बोधवडला चुकीचं बोलून गेलो, लय चाललं ते. एवढं चालवलं या कॅमेरावाल्यांनी की अंदाज नाही. आता मी तो गाल सोडला आणि ओम पुरीचा गाल पकडला. याच्यावर तर कुणी टीका करु नये (उपस्थितांमध्ये हशा). आता लोकं जो बोलायला लागला त्याच्या मागं टीका करत असतात. पण माझं एकच म्हणणं आहे की काम हे आमचं सगळ्यात मोठं भांडवल आहे आणि ते काम करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केला आहे’, असं गुलाबराव पाटील म्हणाले.
गुलाबराव पाटलांचं वादग्रस्त व्यक्तव्य काय?
‘गेली 30 वर्षे ते या भागातील आमदार आहेत. पण ते चांगले रस्ते करु शकले नाहीत. माझ्या धरणगाव मतदारसंघात या आणि बघा हेमा मालिनीच्या गालासारखे सुंदर रस्ते आम्ही केले आहेत’, असं वक्तव्य पाटील यांनी केलं होतं. दरम्यान, आपल्या वक्तव्याबाबत दिवसभर सर्व स्तरातून टीका झाल्यानंतर पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. ‘भाषणातील माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करत माफी मागतो’, असं ते म्हणाले होते.
गुलाबरावांच्या वक्तव्यावर हेमामालिनी काय म्हणाल्या होत्या?
हेमा मालिनी यांनी मीडियाशी संवाद साधताना संतप्त प्रतिक्रिया दिली होती की, मी माझे गाल चांगले ठेवत असते म्हणून कदाचित बोलले असतील. हरकत नाही. हा विनोदाचा भाग सोडा. मला वाटतं त्यांना काही वाटलं असेल म्हणून बोलले. काही वर्षांपूर्वी लालूंनी असं विधान केलं होतं. त्यानंतर अनेकांनी तसंच बोलायला सुरुवात केली. पण अशा प्रकारची कमेंट करणं योग्य नाही. सामान्य लोकांनी बोलणं वेगळं. पण संसदीय राजकारणातील व्यक्तीने असं विधान करू नये. कोणत्याही स्त्रीबाबत असं विधान केलं जाऊ नये, असं हेमा मालिनी म्हणाल्या.
इतर बातम्या :