Video : कोरोना रुग्णांसोबत रोहित पवारांचा ‘झिंगाट’ डान्स! कोरोना रुग्णही भारावले
कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी कोरोना रुग्णांसोबत झिंगाट गाण्यावर ठेका धरला.
अहमदनगर : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरुच आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता तिसऱ्या लाटेचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशावेळी कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी रुग्णालयांसह कोविड सेंटर्सही महत्वाची भूमिका बजावत आहेत. कोविड सेंटरमधील कोरोना रुग्णांना उपचारासह मानसिक आधार देण्याचे प्रयत्न विविध सेवाभावी संस्था आणि नेतेमंडळींकडून सुरु आहेत. त्याचाच प्रत्यय आज अहमदनगरच्या गायकरवाडीत आला. कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी कोरोना रुग्णांसोबत झिंगाट गाण्यावर ठेका धरला. (Rohit Pawar dances with corona patients at Kovid Center)
कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या कर्जत तालुक्यातील गायकरवाडी येथील कोव्हीड केअर सेंटरला आमदार रोहित पवार यांनी सोमवारी भेट दिली. यावेळी रुग्णांशी संवाद साधत त्यांनी रुग्णांना धीर देण्याचा प्रयत्न केला. रुग्णांचे मनोबल वाढावे तसंच त्यांना मनोरंजन म्हणून गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी रोहित पवार हे रुग्णांच्या चेहऱ्यावरील निराशा दूर करण्यासाठी रुग्णांसोबत झिंगाट गाण्यावर थिरकल्याचं पाहायला मिळालं. यावेळी कोरोना रुग्णही भारावल्याचं पाहायला मिळालं.
गायकरवाडी (कर्जत) येथील कोविड सेंटरमध्ये रुग्णांमध्ये असलेलं गंभीर वातावरण हलकंफुलकं करण्यासाठी गायक तुषार घोडके यांचा गाण्याचा कार्यक्रम ठेवला होता. यावेळी त्यांच्या ‘झिंगाट’ गाण्यावर तिथल्या आजींनीही ठेका धरला आणि आणि नकळत मीही त्यांच्यात सहभागी झालो. pic.twitter.com/EuniVa8FU6
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 24, 2021
कोरोना रुग्णांची सातत्याने विचारपूस
रोहित पवार हे सातत्याने आपल्या मतदारसंघातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेताना पाहायला मिळतात. वेळोवेळी विविध रुग्णालये, तसंच कोविड सेंटरला भेटी देऊन ते रुग्णांशी चर्चा करताना पाहायला मिळतात. तसंच रुग्णांवर होणाऱ्या उपचारांची माहितीही ते घेत असतात. रविवारी रोहित पवार यांनी बारामतीमधील कोविड सेंटरला भेट देत स्थितीचा आढावा घेतला.
काल बारामतीत बारामती हॉस्पिटल, जगन्नाथ हॉस्पिटल आणि गिरीराज हॉस्पिटलला भेट देऊन तिथं उपचार घेणाऱ्या माझ्या मतदारसंघातील आणि इतरही रुग्णांची विचारपूस केली. यावेळी अहोरात्र रुग्णसेवा करणारे डॉक्टर आणि नर्स यांच्याशीही चर्चा केली. हे सर्वजण अत्यंत चांगलं काम करत आहेत. pic.twitter.com/MyLzIPhvOa
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 24, 2021
संबंधित बातम्या :
राज्यसरकार नुकसानग्रस्तांना मदत करेलच, पण फडणवीसांनीही केंद्राला पत्र लिहावं : रोहित पवार
Rohit Pawar dances with corona patients at Kovid Center