MLC Election 2022: विधान परिषदेला ठाकूरांचा भाजपला ठेंगा? मतदान होताच हिंतेंद्र ठाकूर अजित दादांच्या भेटीला, मिटकरी म्हणतात, आम्हालाच मतदान !
विधान परिषद निवडणुकीत बहुजन विकास आघाडीनं राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान केल्याचे दावे केले जात आहेत. आता या मतांच्या आधारावर महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होतो का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
मुंबईः राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) पराभवाच्या कारणांपैकी एक बहुजन विकास आघाडीनं यंदा भाजपला ठेंगा दाखवला असल्याची शक्यता आहे. या पक्षाच्या तिन्ही आमदारांनी मविआकडून मतदान केल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केला आहे. विधान परिषद निवडणुकीत बहुजन विकास आघाडीची तीन मतं मिळवण्यासाठी सर्व पक्षांनी चांगलीच फिल्डिंग लावली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना नेत्यांनी पक्षाचे प्रमुख हितेंद्र ठाकुरांना (Hitendra Thakur) थेट विनंती केली होती. भाजपचे उमेदवार प्रवीण दरेकर यांनी तर या मतांसाठी थेट लोकलमधून विरारही गाठलं होतं. मात्र विधान परिषद निवडणुकीत बहुजन विकास आघाडीनं राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान केल्याचे दावे केले जात आहेत. आता या मतांच्या आधारावर महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होतो का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
हितेंद्र ठाकूर अजितदादांच्या भेटीला
विधान परिषदेचं मतदान पार पडल्यानंतर अनेक अपक्ष आमदारांनी अजित पवारांची भेट घेतली. त्यामुळे राज्यसभेत जरी फडणवीसांची चाणाक्षनीती कामी आली तरी विधान परिषद निवडणुकीत अजित पवारांची दादागिरी प्रभावी ठरणार, अशी चर्चा राजकीय गोटात रंगली होती. मतदानानंतर अजित पवारांच्या भेटीला येणाऱ्या अपक्ष आमदारांच्या चित्रावरून हे भाकित खरं ठरतंय की काय, असू वाटू लागलंय. त्यातच बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूरांनीही अजितदादांची भेट घेतली. याआधी त्यांनी राष्ट्रवादीसाठी मतदान करणार असल्याचं जाहीर केलं होतं.
अमोल मिटकरी काय म्हणाले?
विधान परिषदेसाठीचं मतदान हे गुप्त पद्धतीनं घेतलं जातं. नुकतंच विधान परिषदेच्या निवडणुकीसाठीचं मतदान पार पडलंय. निकालानंतर महाविकास आघाडीचेच उमेदवार विजयी घोषित होतील, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं करण्यात आलंय. याविषयी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले, जयंत पाटली आणि अजित पवार मतदानावर लक्ष ठेवून होते. आम्हाला आमच्या विजयाचा विश्वास आहे. आमचे सर्व उमेदवार निवडून येतील. एकनाथ खडसे यांचे अनेक समर्थक भाजपमध्ये आहेत. त्यांच्या आमदारांची मतंही आम्हाला मिळाली आहेत. तसेच बहुजन विकास आघाडीची मतंही आम्हाला मिळाली आहेत, असं वक्तव्य अमोल मिटकरींनी केलं.