उद्धव ठाकरे यांना मतदान करणं म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाला मत देणं; बावनकुळे यांच्या विधानामागचं लॉजिक काय?
काही लोकांना स्वत:ला मोठं करण्याची सवय आहे. आपल्याला धमक्या येत असल्याचं सांगण्याचा ट्रेंड सुरू आहे. अंधारेंना कोणते फोन आले माहीत नाही.
मुंबई: आगामी महापालिका (bmc) आणि विधानसभा निवडणुकीची भाजपने जय्यत तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपने (bjp) मतदारसंघ बांधण्यास सुरुवात केली आहे. हे करत असतानाच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे गटावर हल्लाबोल सुरू केला आहे. त्यातही उद्धव ठाकरे गटावर भाजपने अधिक हल्ला चढवण्यास सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे यांना मराठी आणि हिंदू मते मिळू नये म्हणून भाजपने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांनी तर उद्धव ठाकरे यांना मतदान करणं म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मतदान करण्यासारखं असल्याचा दावा केला आहे.
चंद्रशेखर बावनकुळे काल मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी हा दावा केला. भाजपने वरळीवर अधिक लक्ष केंद्रीत केलं आहे. त्या मानाने ठाकरे गटाकडून वरळीत कोणतेही कार्यक्रम घेतले जात नाहीत. त्यावरही चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
त्यांना फार जनतेचं जनमत मिळत नाही. आदित्य ठाकरेंनी कार्यक्रम घेतला तर त्याला किती लोकं येतील याची त्यांना भीती आहे. हिंदूंचं मन तोडून त्यांनी व्यवहार सुरू केला आहे. आताही ते भारतजोडोत सहभागी आहेत. सावरकरांवर टीका करणाऱ्यांच्यासोबत बसलेले आहेत. त्यामुळे ते वरळीत कार्यक्रम घेण्यास धजावत नाहीत, असा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला.
ठाकरे गटाला मशाल मिळाली आहे. मशाल पंजाच्या हाती आहे. त्यांनी पंजाचा आणि घडीचा विचार स्वीकारला आहे. ही मशाल खूप काळ टिकणार नाही. उद्धव ठाकरेंना मत देणं म्हणजे काँग्रेसला मत देणं. उद्धव ठाकरेंना मत देणं म्हणजे राष्ट्रवादीला मत देणं आहे. हिंदुत्ववादी मराठी मतांचं मन दुखवणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोक आहेत. त्यांना मतदान करायचं असेल तर उद्धव ठाकरेंना मतदान करणं असा अर्थ आहे, असं ते म्हणाले.
वरळीत मराठी माणूस उद्धव ठाकरेंकडे नाही. वरळीतील मतदार हा शिवसेनेसोबत नाही. आम्ही दहीहंडी, नवरात्र आणि दिवाळी पहाटला परवानगी दिली. सर्व समुदायांना खुली सुट दिली आहे. त्यामुळे राज्यात उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. वरळीत आमच्या सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल सुरू आहे, असं त्यांनी सांगितलं.
?भाजप कार्यालय, नरिमन पॉइंट येथे माध्यमांशी संवाद https://t.co/SW84NXMCL2
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) October 14, 2022
उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना धमकीचे फोन येत आहेत. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. काही लोकांना स्वत:ला मोठं करण्याची सवय आहे. आपल्याला धमक्या येत असल्याचं सांगण्याचा ट्रेंड सुरू आहे. अंधारेंना कोणते फोन आले माहीत नाही. ते सरकार पाहील. त्याबद्दल मी बोलणार नाही. धमकी येत आहे तर त्यांनी सरकारला पत्रं दिलं पाहिजे. फोन रेकॉर्ड केले असतील तर तेही दिले पाहिजे. सरकार त्यांना निश्चितच संरक्षण देईल, असं ते म्हणाले.
महाराष्ट्रात प्रवेशाचे असे असे बॉम्बस्फोट होणार आहे की आघाडीच्या नेत्यांना 2024मध्ये उमेदवारही मिळणार नाही. किरण पाटील यांना आम्ही आता मराठवाड्यात शिक्षक नोंदणी अभियानाचे प्रमुख केलं आहे. मराठवाड्यात आम्ही शिक्षक मतदारसंघ जिंकला नाही. पुढच्या काळात हा मतदारसंघ आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी शिक्षक मतदारांची नोंदणी करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.