मरणाच्या सरणावर महाराष्ट्राला कोण ढकलतंय?, लसीबाबत महाराष्ट्रासोबत भेदभाव?; वाचा सविस्तर

| Updated on: Apr 09, 2021 | 1:20 PM

राज्यात केवळ दोन ते तीन दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा उपलब्ध आहे. (War of words over vaccine between bjp and maha vikas aghadi in maharashtra)

मरणाच्या सरणावर महाराष्ट्राला कोण ढकलतंय?, लसीबाबत महाराष्ट्रासोबत भेदभाव?; वाचा सविस्तर
devendra fadnavis
Follow us on

मुंबई: राज्यात केवळ दोन ते तीन दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा उपलब्ध आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारला लस पुरवण्याची कळकळीची विनंती केली. तसेच गुजरात छोटं राज्य असूनही महाराष्ट्रापेक्षा गुजरातला अधिक लसींचा पुरवठा करण्यात आल्याचा आरोप टोपे यांनी केला. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारने लसीकरणाचं योग्य नियोजन केलं नसल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे लसीच्या साठ्यावरून राजकारण सुरू झालं आहे. लसीबाबत महाराष्ट्रासोबत खरोखरच भेदभाव झाला आहे का? त्याबाबतचा घेतलेला हा आढावा. (War of words over vaccine between bjp and maha vikas aghadi in maharashtra)

टोपे काय म्हणाले?

गुजरातमध्ये कोरोना रुग्णांची अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या महाराष्ट्रापेक्षा निम्मी आहे. लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र गुजरातच्या दुप्पट आहे. तरीही केंद्र सरकारने गुजरातला आतापर्यंत 1 कोटी लसींचा (Corona vaccine) साठा दिला आहे. तर महाराष्ट्राच्या वाट्याला अवघ्या 1 कोटी 14 लाख लसी आल्या आहेत, असे सांगत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारच्या लस वाटप धोरणाविषयी नाराजी व्यक्त केली होती.

आठवड्याला 40 लाख लस हव्यात

यावेळी टोपे यांनी केंद्र सरकारच्या लस वाटप धोरणातील त्रुटींवर बोट ठेवले. आम्हाला केंद्र सरकारशी भांडायचे नाही. केंद्र सरकार महाराष्ट्राला सहकार्यही करत आहे. मात्र, केंद्र सरकारने महाराष्ट्राला प्रत्येक आठवड्याला असणारी 40 लाख लसींची गरज लक्षात घेतली पाहिजे. सध्या महाराष्ट्राकडे जवळपास 9 लाख लसी आहेत. हा साठा दीड दिवस पुरेल. केंद्र सरकारने नव्याने 17 लाख लसी दिल्या असल्या तरी आठवड्याला 40 लाख या मागणीच्या तुलनेत हा साठा अपुरा आहे, असे त्यांनी सांगितलं.

राज्याला किती लस आल्या?

महाविकासआघाडी सरकारच्या आग्रही मागणीनंतर केंद्र सरकारने गुरुवारी महाराष्ट्रासह अन्य राज्यांना कोरोना लसींचे वाटप केले. यामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला अवघ्या 7,40,000 लशी आल्या आहे. तर लस वाटपात केंद्राने भाजपशासित राज्यांना झुकते माप दिल्याची चर्चा आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात दिवसाकाठी 4 लाख लोकांना लस दिली जात आहे. केंद्र सरकारकडून वेगाने पुरवठा झाला तर ही संख्या आठ लाखापर्यंत वाढवण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. तरीही केंद्र सरकारने महाराष्ट्राला अवघ्या 7,40,000 लसी दिल्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

फडणवीस काय म्हणाले?

“केवळ तीन राज्यांनाच 1 कोटीपेक्षा अधिक लस प्राप्त झाल्या आहेत. महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान. यात गुजरात आणि राजस्थानची लोकसंख्या समान. (राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार) लसींचा पुरवठा हा लोकसंख्येच्या आधारावर नाही, तर त्या-त्या राज्यांच्या लसिकरणातील कामगिरीच्या आधारावर! महाराष्ट्राला 1.06 कोटी लस प्राप्त झाल्या. तसे ट्विट डीजीआयपीआरने 26 एप्रिल रोजी केले आहे. 91 लाख लसी वापरल्या. म्हणजे 15 लाख लस शिल्लक आहेत. मग, आज जाणिवपूर्वक केंद्र बंद करून लसींबाबत चुकीच्या बातम्या पसरविण्याचे कारण काय?” असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला विचारला आहे.

आज ज्या राज्यांना कोटा दिला आहे, तितक्या लसी पुरवठ्याच्या मार्गात (पाईपलाईनमध्ये) आहेत, तो पुरवठा 9 ते 12 एप्रिल या काळात होईल. यात महाराष्ट्राला पुन्हा अधिकच्या 19 लाख लस मिळणार आहेत. उत्तर प्रदेश हे सर्वांत मोठे राज्य आहे. त्यांना 92 लाख लसींचे डोज मिळाले आहेत. त्यांनी 83 लाख डोज वापरले आहेत आणि 9 लाख लसींच्या मात्रा त्यांच्याकडे शिल्लक आहेत. हरयाणाला पहिल्या पाईपलाईनमध्ये फारसे डोज मिळाले नव्हते. त्यांना आता डोज प्राप्त होत आहेत, असंही फडणवीसांनी म्हटलंय.

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची हल्लाबोल?

महाराष्ट्र सरकारच्या बेजबाबदारपणामुळे केंद्राच्या कोरोना विरुद्धच्या लढ्याला सुरुंग लागल्याचा आरोप केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केलाय. तसेच महाराष्ट्र सरकार राजकारण करत असून केंद्र सरकारवर निराधार आरोप करत असल्याचाही दावा हर्षवर्धन यांनी केला. महाराष्ट्र सरकारने मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना लस पुरवठ्यातील तुटवड्यावरुन केंद्रावर हल्ला चढवला होता त्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी हे आरोप केले आहेत.

vaccine data

86 टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला डोस

“महाराष्ट्रात केवळ 86 टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आलाय. या प्रमाणे महाराष्ट्रातील केवळ 41 टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीचा दुसरा डोस देण्यात आलाय. याशिवाय महाराष्ट्रात केवळ 73 टक्के फ्रंटलाइन वर्कर्सला कोरोनाचा पहिला डोस देण्यात आलाय. तसेच 41 टक्के फ्रंटलाइन वर्कर्सला कोरोना लसीचा दुसरा डोस देण्यात आलाय,” असंही हर्षवर्धन यांनी सांगितलं.

कुणाला किती लस

महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटी असताना राज्याला केवळ 89 लाख 49 हजार डोस मिळाले आहेत
राजस्थानची लोकसंख्या 7 असूनही कोटी राजस्थानला 82 लाख 87 हजार डोस मिळाले आहेत.
गुजरातची लोकसंख्या अवघी 6 कोटी असूनही गुजरातला मिळालेत 81 लाख 47 हजार डोस.

 

15 एप्रिलपर्यंत किती डोस मिळणार?

महाराष्ट्राला साडे 17 लाख डोस मिळतील
गुजरातला सर्वाधिक 30 लाख डोस मिळणार
तर हरियाणाला 24 लाख डोस मिळणार आहेत

लसीकरण कुठवर आलं?

भारतात आतापर्यंत 9 कोटी लोकांचं लसीकरण झालं आहे. भारतानं परदेशात 6 कोटी डोस दिले आहेत. म्हणजेच एकूण लसीकरणाच्या जवळपास 70 टक्के डोस निर्यात झाले आहेत. एकूण 65 देशांना भारतानं लसी दिल्यात. निर्यात केलेल्या देशांचा विचार केला तर 10 मार्चपर्यंतच्या आकडेवारीनुसार बांगलादेशला 90 लाख, म्यानमारला 37 लाख डोस, नेपाळला 23.48 लाख डोस, भूटानला 1.5 लाख डोस, मॉरिशसला 2 लाख डोस तर श्रीलंकेला 12.64 लाख डोस देण्यात आले आहेत. तर पाकिस्तानला करारानुसार 4 कोटी 50 लाख डोस मिळणार आहेत.

पुणे, सातारा, सांगली, पनवेलमध्ये लसीकरण बंद

राज्यात अनेक ठिकाणी लसींचा साठा संपल्यानं लसीकरण केंद्र बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर आलीय. राज्यात सातारा, सांगली, कोल्हापूर, पनवेलसह अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आली आहे. तर पुणे, मुंबई, नागपूर आणि सोलापूर जिल्ह्यात दोन दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक राहिलाय. पुण्यातही काल काही भागातील लसीकरण केंद्रांवरुन लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना परतावं लागल्याचा प्रकार घडला. (War of words over vaccine between bjp and maha vikas aghadi in maharashtra)

मुंबईतील 26 लसीकरण केंद्र बंद

मुंबईतील 72 पैकी 26 खासगी व्हॅक्सीनसेंटरमधील लस संपल्याने या 26 ठिकाणचं लसीकरण बंद करण्यात आलं आहे. मुंबईतील सर्वात मोठं लसीकरण केंद्र असलेल्या बीकेसी कोविड सेंटरमध्येही लस संपल्याने या ठिकाणचंही लसीकरण बंद करण्यात आलं आहे. पालिकेने शेकडो लोकांना फोन करून कोरोनाची लस घेण्यासाठी बीकेसी केंद्रावर बोलावलं होतं. त्यानुसार शेकडो लोक बीकेसीला आले होते. मात्र, केवळ पाच हजारच लस असल्याने आधी आलेल्या नागरिकांना त्या देण्यात आल्या. त्यानंतर लस संपल्याचं सांगत तसा बोर्डही केंद्रावर लावण्यात आला. त्यामुळे नागरिक प्रचंड संतप्त झाले. अपुरा साठा होता तर रांगेत उभं का केलं? लस अपुऱ्या होत्या तर तेवढ्याच लोकांना फोन करून बोलवायचं होतं, सरसकट सगळ्यांना का बोलावलं? साठा संपल्याचं फोनवरून का कळवलं नाही? असे एक ना अनेक प्रश्न नागरिकांकडून करण्यात आले. त्यामुळे या ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईत एकूण 120 लसीकरण केंद्र आहेत. त्यापैीक 49 लसीकरण केंद्रे शासकीय आहेत. या केंद्रावर रोज 40 हजार ते 50 हजार लस दिल्या जातात. बुधवारी राज्यात 14 लाख डोस होत्या. अनेक जिल्ह्यात आज किंवा उद्या कोरोना लसीचा साठा संपेल. केंद्राला याबाबतची माहिती लिखित स्वरुपात दिली असल्याचं आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांनी सांगितलं. (War of words over vaccine between bjp and maha vikas aghadi in maharashtra)

 

संबंधित बातम्या:

आता संपूर्ण लॉकडाऊनची गरज नाही, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मोदींचं स्पष्टीकरण

Maharashtra Lockdown : महाराष्ट्रात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन अपरिहार्य, वडेट्टीवारांचे संकेत

बीकेसीसह मुंबईतील 26 लसीकरण केंद्र बंद; वाचा, सविस्तर लिस्ट

(War of words over vaccine between bjp and maha vikas aghadi in maharashtra)