शिवबंधन सोडलेल्या माजी राज्यमंत्र्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश
अशोक शिंदे हे हिंगणघाट मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिले आहेत. माजी राज्यमंत्री असलेल्या शिंदेंकडे शिवसेनेचे उपनेतेपद होते. 1995 मध्ये शिंदे शिवसेनेच्या तिकिटावर पहिल्यांदा आमदार झाले होते.

मुंबई : शिवसेनेला रामराम ठोकलेले माजी राज्यमंत्री अशोक शिंदे (Ashok Shinde) यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत मुंबईत अशोक शिंदेंनी कार्यकर्त्यांसह काँग्रेसचा झेंडा हाती धरला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप, मोहन जोशी, रणजितसिंह देशमुख या नेत्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. अशोक शिंदे हे वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत.
डावलल्यामुळे अशोक शिंदे नाराज
अशोक शिंदे हे हिंगणघाट मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिले आहेत. माजी राज्यमंत्री असलेल्या शिंदेंकडे शिवसेनेचे उपनेतेपद होते. 1995 मध्ये शिंदे शिवसेनेच्या तिकिटावर पहिल्यांदा आमदार झाले होते. मात्र पक्षाकडून मागील काही दिवसांपासून स्थानिक पातळीवर डावलले गेल्यामुळे ते नाराज होते. गेल्याच महिन्यात त्यांनी शिवसेनेचा हात सोडला होता.
शिवसेनेच्या माजी खासदारासोबत तीव्र मतभेद
शिवसेनेचे वर्धा जिल्हा संपर्कप्रमुख आणि माजी खासदार अनंत गुढे (Anant Gudhe) आणि अशोक शिंदे यांच्यात तीव्र मतभेद निर्माण झाले होते. अशोक शिंदे यांनी मुंबईला जाऊन शिवसेना पक्षनेतृत्वाकडेही गुढे प्रकरणात न्याय मागितला होता, परंतु सेनेच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांची दखल घेतली नसल्याचं बोललं जातं. त्यानंत अशोक शिंदेंनी शिवबंधन सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
कोण आहेत अशोक शिंदे?
अशोक शिंदे हे वर्ध्यातील हिंगणघाट मतदारसंघातून तीन वेळा आमदार 1995, 1999 आणि 2009 असे तीन वेळा शिवसेनेकडून आमदार 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराकडून पराभव मनोहर जोशी यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात शिंदेंकडे राज्यमंत्रिपद अशोक शिंदेंकडे शिवसेनेचे उपनेतेपद होते, जुलैमध्ये पक्षाला रामराम
नाना पटोलेंच्या उपस्थितीत काँग्रेस प्रवेश
मुंबईत काल (मंगळवार) दुपारी अशोक शिंदे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडल्यापासून नाना पटोले (Nana Patole) यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा एल्गार केल्यापासूनच पटोलेंच्या नेतृत्वात अनेक नेत्यांचे पक्षप्रवेश होऊ लागले आहेत.
माजी राज्यमंत्री व हिंगणघाट विधानसभेचे माजी आमदार अशोक शिंदे यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत आज कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांचे हार्दिक स्वागत व पुढील कार्यासाठी शुभेच्छा! pic.twitter.com/5dUWAXfQ9G
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) August 3, 2021
जनता क्रांती दलाचे प्रदेशाध्यक्ष काँग्रेसमध्ये
दरम्यान, सातारा जिल्ह्यातील जनता क्रांती दलाचे प्रदेशाध्यक्ष सत्यवान कमाने यांनीही मुंबईत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भाई जगताप, मोहन जोशी, रणजितसिंह देशमुख या नेत्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी कमाने यांचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संबंधित बातम्या:
शिवसेनेला धक्का, माजी राज्यमंत्री शिवबंधन सोडून पटोलेंच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये
काल माजी राज्यमंत्र्याने शिवसेना सोडली, आता चार टर्म आमदार पक्षावर नाराज