आम्ही खरे जावळीचे मोरे, पण… चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आपलं कुळ आणि मूळ
कोविडच्या काळात सुरुवातीला आपल्याला प्रत्येक गोष्ट बाहेरून आणावी लागत होती. पण मोदींच्या दुरदृष्टीमुळे आपल्याला सर्व गोष्टी मिळाल्या.
अभिजीत पोते, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे: भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी आपल्या आडनावाबद्दलचा नवा खुलासा केला आहे. माझा चुलत भाऊ पोलीस पाटील आहे. आम्ही खरे जावळीचे मोरे आहोत. मात्र, अनेक काळ आमच्या घरात पोलीस पाटील (police patil) पद राहिलं. म्हणून आमचं आडनाव पाटील पडलं, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला. पालकमंत्री म्हणून पुणे पोलिसांचं (pune police) कौतुक करावसं वाटतं. कोरोनाच्या काळातही पोलीस घरी बसले नाहीत. त्यामुळेच कोट्यवधी लोकांचे जीव वाचू शकले, असं सांगतानाच येत्या काळात नव्याने 20 हजार पोलिसांची भरती करण्यात येणार आहे. पोलीस क्वॉर्टरची अवस्था दयनीय आहे. त्याकडे लक्ष देणार आहे. तसेच जिल्हा नियोजन समितीतून निधी वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. पालकमंत्री म्हणून मला नक्कीच अधिकार असल्याने पोलिसांसाठी मी ही कामे करणार आहे, अशी ग्वाही चंद्रकांत पाटील यांनी दिली.
चंद्रकांत पाटील मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. कोविडच्या काळात सुरुवातीला आपल्याला प्रत्येक गोष्ट बाहेरून आणावी लागत होती. पण मोदींच्या दुरदृष्टीमुळे आपल्याला सर्व गोष्टी मिळाल्या. एवढंच काय लस आपण निर्माण केली आणि ही लस आपण जगाला दिली, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
कोविड काळात पोलिसा पाटलांनी महत्त्वाचं काम केलं होतं. गावा आणि पोलिसांमधील दुवा म्हणजे पोलीस पाटील आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांच्या आठवणींना उजाळा दिला. आर के लक्ष्मण यांनी त्यांच्या व्यंगचित्रातून समाजात जागरूकता निर्माण केली आहे. नेहमी कॉमन मॅन त्यांच्या व्यंगचित्राच्या केंद्रस्थानी राहिला आहे. व्यंगचित्रं हे आरके लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रामुळे अमर झाले. आजही अनेक वृत्तपत्रात त्यांचे कार्टुन येत असतात. जवळपास 70 वर्ष त्यांनी हे काम केलं आहे, हे सगळ अजरामर आहे, असं ते म्हणाले.
पुण्यात आज पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्मृतीचीन्हाचे अनावरण पार पडलं. या कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती होती. त्यासोबतच यावेळी कार्यक्रमाला व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्या कन्या उषा लक्ष्मण या देखील उपस्थित होत्या. यात पुणे ग्रामीण पोलीस प्रशासनाच्या नवीन स्मृती चिन्हाचं अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं.
लक्ष्मण यांचा कॉमन मॅन आणि पोलीस दलातील शिपाई यांची प्रतिकृती बनवण्यात आली आहे. त्यासोबतच आज या कार्यक्रमात कोविडच्या काळात ज्या पोलीस पाटलांचं निधन झालं अशांच्या कुटुंबांना 50 लाख रुपयांची मदत देखील पुणे ग्रामीण पोलिसांकडून करण्यात आली आहे.