मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेतच नव्हे तर महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे. त्यामुळे आज महाविकास आघाडीच्या (maha vikas aghadi) नेत्यांनी तातडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानी धाव घेतली. काँग्रेसचे नेते नाना पटोले, बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि जयंत पाटील हे वर्षावर आले होते. या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांच्या बंडाबाबत चर्चा केली. मुख्यमंत्री आणि शिंदे यांच्यात झालेल्या फोनवरील संभाषणावरही चर्चा केली. तसेच पुढे काय करायचं यावरही चर्चा केली. काँग्रेसने तर आघाडीवर कितीही संकट आलं तरी आम्ही तुमच्याच सोबत आहोत, असा विश्वासच काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली.
काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे आमदार सर्व आमच्यासोबत आहेत. आमचे काही आमदार उद्या मुंबईत येत आहेत. त्यांना आमचे राष्ट्रीय नेते कमलनाथ मार्गदर्शन करतील. शिवसेनेत प्रॉब्लेम सुरू आहेत. त्यात स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष घातलं आहे. मला वाटतं आमचं बहुमत राहील. महाविकास आघाडीला कोणताही धोका नाही, असं सांगतानाच आम्ही शिवसेनेसोबत असल्याचा विश्वास आम्ही मुख्यमंत्र्यांना दिला आहे, असं थोरात म्हणाले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी आघाडीला कोणताही धोका नसल्याचं सांगितलं. काँग्रेसचे कोणतेही आमदार नॉट रिचेबल नाहीत. सर्व आमदार जमा होत आहेत. काही यायला निघाले आहेत. काँग्रेसचे 44 आमदार मुंबईत जमा होतील. राज्यात जी परिस्थिती तयार झाली आहे. त्यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. आमच्या आमदारांशी कुणीही संपर्क साधलेला नाही. ते आमच्यासोबत आहेत, असंही पटोले यांनी सांगितलं.
यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला केला. केंद्रातील मोदी सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करून त्यांनी कर्नाटक आणि मध्यप्रदेशातील आमचं सरकार पाडलं. आता तोच उपक्रम राबविला जात आहे. लोकशाहीला न मानणारे हे लोक आहेत. हे ऑपरेशन गुजतरातमधून सुरू आहे. गुजरातमधून ऑपरेशन सुरू आहे. त्यामुळे वेगळं काही सांगायची गरज नाही, असा टोला पटोले यांनी लगावला.
एकनाथ शिंदे यांचं बंड हे शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. शिवसेना तो प्रश्न सेटल करेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लक्ष घालून आहेत. हे बंड लवकरच संपुष्टात येईल, असा दावाही त्यांनी केला.