शिर्डी : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे राज्यातील शिंदे सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली आहे. त्यामुळे आता शिंदे गटावर जोरदार टीका होत आहे. अजित पवार आम्हाला निधी देत नव्हते. अजित पवार शिवसेना संपवायला निघाले होते. राष्ट्रवादी हा आमच्या विचाराचा पक्ष नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी कधीच राष्ट्रवादीशी युती केली नसती. आमची महाविकास आघाडीत घुसमट होत होती, त्यामुळेच आम्ही शिवसेनेतून बाहेर पडल्याचा दावा शिंदे गटाचे आमदार करत होते. मात्र आता तेच अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्याने शिंदे गटाची चांगलीच कोंडी झाली आहे. शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी तर एक मोठं विधान करून सपशेल यूटर्न घेतला आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
मंत्री दीपक केसरकर हे आज शिर्डीत आले होते. साईबाबांचे दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधताना हा यूटर्न घेतला. अजित दादांवर आमच्यापैकी कुणीच टीका केली नाही. दादा आज ना उद्या आमच्यासोबत येणार याची आम्हाला खात्री होती. जी टीका झाली ती शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात झाली. देवेंद्र फडणवीसांनी विश्वास ठेवला मात्र शरद पवारांनी त्यांची निराशा केली, असं दीपक केसरकर म्हणाले.
राष्ट्रवादी सोबत आल्याने शिंदे गटाला डावललं जाणार नाही. आमचे जे लोक मंत्री होणार आहेत त्यांना शपथ दिली जाईल. काही लोकं सरकारमध्ये सामील होऊ इच्छित होते. मंत्रिमंडळ विस्तार लांबल्याचे कारण आता सर्वांना लक्षात आले असेल. शिंदे-फडणवीस यांच्या कामाची गती दादा आल्याने आणखी वाढेल, असं केसरकर म्हणाले.
अजून 18 मंत्री व्हायचे आहेत. त्यामुळे आमच्या लोकांवर अन्याय होईल असे म्हणण्याचे कारण नाही. लवकरच त्यांचाही शपथविधी होईल, असं सांगतानाच मविआ सरकारमध्ये आम्हाला निधी मिळत नव्हता. मात्र आमचे मुख्यमंत्री गप्प असल्याने त्यांची साथ सोडली, असंही त्यांनी सांगितलं.
मंत्री हसन मुश्रीफ यांच्या ईडी चौकशीवरूनही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. हसन मुश्रीफ राष्ट्रवादीच्या कोट्यातून मंत्री झाले आहेत. त्यांची जी उत्तर असतील त्यांनी ती ईडीला द्यावीत. ईडीने फक्त त्यांची चौकशी केली आहे. कारवाई केलेली नाही. चौकशी म्हणजे कारवाई नाही, असं मोोठं विधानही त्यांनी केलं.
आमचा लढा बाळासाहेबांच्या विचारांसाठी होता. राष्ट्रवादीतील संघर्ष हा नेतृत्वाच्या प्रश्नावरून झालाय. अजितदादांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात होता. त्यांना बाजूला टाकून दुसरं नेतृत्व पुढे यायला लागलं. दादांवर अन्याय व्हायला लागल्याने त्यांनी हा लढा दिला, असंही ते म्हणाले.