मुंबई : निवडणूक आयोगानं (Election Commission) धनुष्यबाण चिन्ह, शिवसेना ( Shiv Sena) नाव शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला. याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, जस खोक्यांचं राजकारण झालं, तसा हा खोक्यांचा निकाल आहे, हे मी परखडपणे सांगतो. महाराष्ट्राच्या जनतेच्या या भावना आहेत. यासाठी मला तुम्ही जेलमध्ये टाकणार असालं, मला फासावर लटकवणार असाल तरी शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची, शिवसेना उद्धव ठाकरे यांची आहे. दुसरी कोणाचीही शिवसेना होऊच शकत नाही, असा ठाम विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
बाळासाहेब यांचा विचार हा आक्रमक आहे. या निकालावर संताप आहे. वेदना आहेत. पण, धक्का नाही, हे अपेक्षित होतं. हे अशाप्रकारेचं चोऱ्या करून आमचं चिन्ह, नाव गोठवतील. बेईमानांना देतील, हे आम्हाला साधारण माहीत होतं, असंही संजय राऊत म्हणाले.
अंधेरीची पोटनिवडणूक शिंदे गटानं लढवलीच नाही. तरी त्यांना दावा केला. आमचं चिन्ह गोठवलं गेलं. त्यांनी निवडणूक लढवतो, असं सांगून गेले. त्यांना ताबडतोब स्थगिती मिळाली. तरीही आम्ही मशालीवर निवडणूक जिंकलो. चिन्ह लोकांपर्यंत पोहचवायला फार वेळ लागत नाही. आम्ही चिन्हही पोहचवू आणि तुम्हालाही पोहचवू.
ज्यांच्या रक्तात नसानसांत राजकीय व्यभिचार आहे ते आपले मालक बदलत असतात. पण, मूळ शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची उद्धव ठाकरे यांचीच आहे. या शिवसेनेचे नेतृत्व हे उद्धव ठाकरे करतात आणि करत राहतील. आम्ही उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहू, असंही संजय राऊत यांनी म्हंटलं.
राजकारण फार चंचल असतं. बहुमत त्याहून चंचल असतं. या देशात लोकशाहीची पाळंमुळं खोलवर रुजली आहेत.हा देश म्हणजे सीरीया, इराक, लिबिया नाही. या देशाला फार मोठी परंपरा आणि संस्कृती आहे. हुकुमशाहीची बीज रोवणारे त्याच पद्धतीने नष्ट झाले. हुकुमशाहाचा अंत अत्यंत वाईट असतो. हुकुमशाहीची तलवार चालविणारे त्याच तलवारीने नष्ट होतात,असं या जगाचा इतिहास सांगतो, असंही संजय राऊत म्हणाले.