Deepak kesarkar : आम्ही अडीच वर्षे असं काम करू की त्यांना फिरता येणार नाही, दीपक केसरकरांचा आदित्य ठाकरेंना इशारा
आम्हाला पण थोडं सहकार्य करा. आमच्यासाठी राजकारण संपलं आहे. आता आम्ही आमचं काम सुरू करणार आहोत, असंही ते म्हणाले.
मुंबई : आदित्य ठाकरे यांनी अडीच वर्षे पर्यटन खात्याचे (Tourism Account) काम केलं. पण त्यानंतर आता आम्ही अडीच वर्ष काम करू की त्यांना फिरता येणार नाही. आम्ही त्यांच्यावर टीका करत नाहीत. पण पर्यटन खात्याचे जास्तीत-जास्त काम करू, असं आश्वासन दीपक केसरकर यांनी दिलं. ते म्हणाले, माझ्याकडे जेवढी माहिती आहे तेवढी मी जो कोणी त्या खात्याचा मंत्री (Minister) बनेल त्याला देईन. शिंदे गटाचं लक्ष्य आदित्य ठाकरे यांच्या पर्यटन खात्यावर आहे. आदित्य ठाकरेंपेक्षा अधिक चांगलं काम करण्याचा मानस आहे. त्यामुळं पर्यटन खात्यावर शिंदे सरकारचं विशेष लक्ष राहणार आहे. आदित्य ठाकरेंपेक्षा जास्त चांगलं काम शिंदे (Eknath Shinde) सरकार करेल, असंही केसरकर म्हणाले.
राजकारण संपलं, आता काम सुरू
दीपक केसरकर यांनी सांगितलं की, मागच्या वेळेस मी शपथ घेतली तेव्हा 48 तासानंतर मला माझं खातं समजलं. पण सुरुवातीला कार्यालय द्यायला हवं, यासाठी काम सुरू आहे. बंगलेदेखील दिले जातात. सर्वांनी बंगले खाली केलेत की नाही माहीत नाही. मुख्यमंत्री त्यांच्या मूळ गावी गेले आहेत. तिथून आल्यानंतर खाती जाहीर करतील. याआधी देखील 35 दिवस झाल्यानंतर मंत्रिमंडळ स्थापन झालं होतं. आम्हाला पण थोडं सहकार्य करा. आमच्यासाठी राजकारण संपलं आहे. आता आम्ही आमचं काम सुरू करणार आहोत, असंही ते म्हणाले.
बाळासाहेब कुणाची खासगी मालमत्ता नाही
तत्पूर्वी दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. बाळासाहेब ठाकरे हे कुणाची खासगी मालमत्ता नाहीय, असं शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी म्हंटलं. बाळासाहेब ठाकरे हे संपूर्ण महाराष्ट्रचे आहेत, असं केसरकर म्हणाले. त्यांनी सांगितलं की, प्रबोधनकार ठाकरेंनी म्हंटलं होतं की, मी माझ्या बाळाला महाराष्ट्राच्या झोळीत टाकत आहे. त्यांनी त्यावेळी महाराष्ट्राच्या झोळीत टाकलं होतं. उद्धव ठाकरे यांचे वडील आहेत. पण, बाळासाहेब महाराष्ट्राच्या जनतेशी संबंधित आहेत. हे बाळासाहेबांच्या वडिलांनी म्हंटलं होतं. ही बाब आपण विसरू शकत नाही. कोणतेही महापुरुष हे संपूर्ण राज्याचे असतात.