मुंबई: राज्यपाल याच दिवसाचा विचार करत होते. ही कायदेशीर कृती आहे. 16 आमदारांच्या निलंबनाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात आहेत. 11 तारखेपर्यंत निर्णय होणार नाही. बेकायदेशीर कृत्य या काळात काही झालं तर आमच्याकडे या असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. राज्यपाल भवन आणि भाजप (bjp) मिळून संविधानाची मजाक उडवत आहे. आमचे लोक सर्वोच्च न्यायालयात जाणार आणि न्याय मागणार, आजही आमचा सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितलं. संजय राऊत हे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी राज्यपालांवर (Bhagatsingh Koshyari) जोरदार टीका केली. मोदींनी आणलेल्या राफेल विमानाच्या वेगापेक्षाही राजभवनाच्या कार्याचा मोठा वेग असल्याचा टोला त्यांनी लगावला. तसेच शिंदे गटाला (Eknath Shinde) वाटत असेल तर मी बोलायचं बंद करेन, पण त्यांनी मुंबईत यावं. नजरेला नजर मिळवावी, असं आवाहनही राऊत यांनी केलं.
राज्यपालांनी बहुमतासाठीचा जो वेळ दिला आहे. तो जेटपेक्षाही फास्ट आहे. मोदींनी जी राफेल विमानं आणलीत, त्यापेक्षाही राजभवनातील कार्याचा प्रचंड वेग आहे. अडीच वर्षापासून 12 आमदारांच्या नियुक्तीची फाईल पडली आहे. त्यावर निर्णय होत नाही. पण काल एक पत्रं येतं आणि त्यावर तात्काळ निर्णय घेतला जातं. हे आश्चर्य आहे, असं संजय राऊत यांनी सांगितलं.
अशाप्रकारे अधिवेशन बोलवता येईल का हा प्रश्न आहे. 16 आमदारांच्या निलंबनाचा मुद्दा कोर्टात पेंडिंग आहे. जोपर्यंत या आमदारांबाबतचा निर्णय होत नाही. तोपर्यंत अधिवेशन घेता येत नाही. बहुमत चाचणी करता येत नाही. त्यांच्या प्रवक्त्यांना काही बोलू द्या. पण हे लोक संविधानाची ऐसीतैसी सुरू आहे. मी ममता बॅनर्जीपासून तेलंगनाच्या नेत्यांशी बोललो. त्यांनाही याबाबत आश्चर्य वाटत आहे. राज्यपालांचा वेग पाहून तेही अचंबित झाले आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षातील नेते आहेत. ते पहिल्या दिवसांपासून सरकार पाडण्याचं स्वप्न पाहत आहेत. सरकारला काम करू न देण्याची त्यांची पहिल्या दिवसांपासून धावपळ सुरू आहे. त्यांना वाटतं आता सरकार स्थापन करू शकतो. त्यांच्या स्वप्नपूर्तीचा हा दिवस आहे. तसेच राज्यपालांना कोणीही भेटू शकतो, असं ते म्हणाले.