Shiv Sena : बाळासाहेब ठाकरेंचं नाव वापरल्यास कायदेशीर कारवाई, शिवसेनेचा महत्त्वाचा ठराव, राऊतांची माहिती; शिंदेंची अडचण होणार?
Shiv Sena : शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज बैठक झाली. या बैठकीत सहा महत्त्वाचे ठराव करण्यात आले आहेत. त्याबाबतची माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज मीडियाला दिली. या ठरावापैकी सहाव्या क्रमांकाचा ठराव अत्यंत महत्त्वाचा असल्याचं राऊत यांनी सांगितलं.
मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेना अधिकच आक्रमक झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली आज शिवसेनेच्या (Shivsena) राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत अत्यंत महत्त्वाचा ठराव करण्यात आला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं नाव वापरण्यास कोणत्याही राजकीय पक्षास मज्जाव करण्यात आला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं नाव वापरल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी याबाबतची माहिती दिली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची अडचण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदे यांनी त्यांच्या गटाला शिवसेना बाळासाहेब गट असं नाव दिलं आहे. त्यांनी या गटाच्या नावाचे पत्रं विधानसभा अध्यक्षांना पत्रं पाठवल्यास शिवसेना त्याविरोधात कोर्टात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज बैठक झाली. या बैठकीत सहा महत्त्वाचे ठराव करण्यात आले आहेत. त्याबाबतची माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज मीडियाला दिली. या ठरावापैकी सहाव्या क्रमांकाचा ठराव अत्यंत महत्त्वाचा असल्याचं राऊत यांनी सांगितलं. बाळासाहेब ठाकरे यांचं नाव इतर कोणत्याही राजकीय संघटनेला वापरता येणार नाही. हे नाव शिवसेनेचं आहे. शिवसेनेसोबत राहील. कोणत्याही बेईमान आणि गद्दार या नावाचा राजकारणात वापरू शकणार नाही. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असं राऊत यांनी सांगितलं.
उद्धव ठाकरेंचं अभिनंदन
आजच्या कार्यकारिणीच्या बैठकीला सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी सहा महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले. त्याबाबतच्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवण्यात आला आहे. तसेच पक्षप्रमुख म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कामाचा गौरव करण्यात आला. त्यांच्या अभिनंदनाचे ठरावही मांडण्यात आले आहेत, असं त्यांनी सांगितलं.
हिंदु्त्वाचं धोरण पुढे नेणार
आज करण्यात आलेल्या पाचव्या ठरावानुसार शिवसेनाही ठाकरेंची आहे व राहील. शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्वाचं धोरण पुढे नेईल. त्या विचाराशी प्रतारणा झाली नाही अन् होणार नाही. मराठी अस्मितेचा विचार आहे. तोही पुढे नेला जाईल, असा ठरावही मंजूर करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
उद्धव ठाकरेंना सर्वाधिकार
ज्यांनी शिवसेनेशी बेईमानी केली ते कोणत्याही पदावर असोत, त्यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करण्यासाठी उद्धव ठाकरें यांना सर्वाधिकार देण्यात आले आहेत. त्यावर लवकरच अंमलबजावणी करण्याची तरतूदही या ठरावात करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
तुमच्या बापाच्या नावाने मते मागा
मतं मागायची असेल तर तुमच्या बापाच्या नावाने मागा. आमच्या बापाच्या नावाने मागू नका, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. गद्दारांवर संध्याकाळपर्यंत कारवाई करण्यात येणार आहे. तसे संकेत उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मंत्रीपदावर कोण राहील व कोण असेल हे तुम्हाला दिसेलच, असंही ते म्हणाले.