तुमचं नशीब चांगलंय की मी शांत बसलीय, नाहीतर…, ममता बॅनर्जींचा भाजपला थेट इशारा
कोलकाता : कोलकाता येथे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या 14 मेच्या रोड शोमध्ये हिंसाचार झाल्यानंतर, अखेर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मौन सोडलं आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन, संपूर्ण प्रकरणाबाबत भूमिका मांडली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह भाजपवर निशाणा साधला. “तुमचं नशीब चांगलं आहे की, मी इथे शांत […]
कोलकाता : कोलकाता येथे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या 14 मेच्या रोड शोमध्ये हिंसाचार झाल्यानंतर, अखेर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मौन सोडलं आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन, संपूर्ण प्रकरणाबाबत भूमिका मांडली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह भाजपवर निशाणा साधला.
“तुमचं नशीब चांगलं आहे की, मी इथे शांत बसली आहे. अन्यथा एका सेकंदात दिल्लीतलं भाजपचं ऑफिस आणि तुमच्या घरांवर ताबा मिळवू शकते.” असा इशारा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी भाजपला दिला. तसेच, “अमित शाह काय देव आहेत काय, जेणेकरुन त्यांच्याविरोधात कुणी निदर्शनं करु शकत नाही?” असाही सवाल ममता बॅनर्जींनी उपस्थित केला.
लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजे 19 मे रोजी पश्चिम बंगालमध्ये उर्वरित मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी 14 मे रोजी रोड शो आयोजित केला होता. मात्र या रोड शो दरम्यान भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना वाद झाला. हा वाद इतका वाढला की त्याचे रुपांतर हिंसाचारात झाले. त्यामुळे अमित शाह यांना रोड शो अर्ध्यात सोडून दिल्लीत परतावे लागले.
West Bengal Chief Minister Mamata Banerjee in Kolkata: Goons were brought from outside, they created violence wearing saffron, violence similar to when Babri Masjid was demolished. https://t.co/pv994Tp125
— ANI (@ANI) May 15, 2019
कोलकात्यातील या हिंसाचारात थोर समाजसुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा पुतळाही अज्ञातांनी तोडला. विद्यासागर महाविद्यालायत ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा पुतळा बसवण्यात आला होता. या पुतळ्याची पुरती नासधूस करण्यात आली. हिंसाचारानंतर ममता बॅनर्जी यांनी ज्यावेळी घटनास्थळाला भेट दिली, त्यावेळी त्यांनी विद्यासागर यांच्या पुतळ्याचे तुकडे आपल्या पदरात टाकून नेले. ममता बॅनर्जी यांच्यासह संपूर्ण पश्चिम बंगालवासीयांना ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्याबद्दल प्रचंड आपुलकी आणि आदर आहे.
कोलकात्यातील हिंसाचाराची निवडणक आयोगाकडून गंभीर दखल
लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पश्चिम बंगालमधील 9 मतदारसंघात 19 मे रोजी मतदान पार पडणार आहे. मतदानाच्या दोन दिवस आधीच म्हणजे 17 मे रोजी संध्याकाळी प्रचार थांबवणं बंधनकारक होतं. मात्र, कोलकात्यातील कालचा (14 मे) हिंसाचार पाहता, निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमधील प्रचार 16 मे रोजी रात्री 10 वाजताच थांबवण्याचे आदेश दिले आहेत.
19 मे रोजी पश्चिम बंगालमधील डमडम, बरासत, बसिऱ्हाट, जयनगर, मथुरापूर, जादवपूर, डायमंड हार्बर, दक्षिण कोलकाता आणि उत्तर कोलकाता या मतदारसंघातील प्रचार 16 मे रोजी रात्री 10 वाजल्यापासून थांबवण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. शिवाय, आज संध्याकाळपासूनच पश्चिम बंगालमध्ये जाहीर सभा आणि रोड शो सुद्धा बंद करण्यात आले आहेत. तसेच, दारु विक्रीवरही बंदी आणण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाचे हे सर्व आदेश मतदान प्रक्रिया पार पडेपर्यंत लागू राहतील, असेही आयोगाने पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. दरम्यान, पश्चिम बंगालचे मुख्य सचिव आणि गृह सचिवांना पदावरुन हटवण्यात आले आहे.