‘मॉक पोल’ म्हणजे नेमकं काय? यावरुन राजकारण का तापलंय?
बीडमध्ये शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणेंनी मतमोजणीच्या दिवशी मतदान केंद्रावर जिल्हाधिकारी आणि तहसीलदार नसावेत, अशी मागणी केलीय. तर नागपुरात काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरेंनी एका मतदान केंद्रावर फेरमतदानाची मागणी केलीय.
लोकसभेच्या निकालाला अवघे काही दिवस शिल्लक असतानाही राज्याचं राजकारण चांगलंच तापलंय. नागपुरात काँग्रेसच्या उमेदवार विकास ठाकरेंनी नागपुरातील एका मतदान केंद्रावर फेरमतदानाची मागणी करत सत्ताधाऱ्यांवर आरोप केले आहेत. तर बीडमध्ये मतमोजणीच्या दिवशी जिल्हाधिकारी आणि तहसीलदार मतमोजणी केंद्रावर नसावेत, अशी मागणी शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी केली आहे. नागपूरच्या दादाजी धुनीवाले या मतदान केंद्रावर मॉक पोलची मतं क्लिअर न करताच मतदान झाल्याचं 35 दिवसानंतर उघड झालंय.
‘मॉक पोल’ म्हणजे नेमकं काय?
मतदानाच्या दिवशी नियमानुसार प्रत्येक मतदान केंद्रांवर ‘मॉक पोल’ म्हणजेच (प्रारुप मतदान) घेण्यात येतं. त्यानंतर कंट्रोल युनिटवरील क्लोज रिजल्ट क्लिअर (CRC) करुन प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होते. मात्र, मतदान केंद्र क्र. 233, दादाजी धुनिवाले महानगरपालिका उच्च प्राथमिक शाळा, या केंद्रावर ‘मॉक पोल’ क्लिअर न करताच मतदान घेण्यात आलं.
या मतदान केंद्रावर एकूण 865 मतदान होते. त्यापैकी 315 जणांनी मतदान केल्याचं 17 C फॉर्मनुसार दिसून येतं.त्यामुळे 4 जून रोजी होणाऱ्या मतमोजणीत या केंद्रावरील मते मोजण्यातच येणार नसल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने जाहीर केलंय. नियमानुसार उमेदवाराचं विजयाचं अंतर 315 पेक्षा कमी असेल तरंच या मतदान केंद्रावरील मतमोजणी होणार आहे.
निवडणूक आयोग काय निर्णय घेणार?
बीडमध्ये बजरंग सोनवणेंनी सत्ताधाऱ्यांवर अधिकाऱ्यांवर दबावतंत्र टाकण्यात येणार असल्याचं आरोप केलाय. तर नागपुरातही काँग्रेस उमेदवाराकडून एका मतदान केंद्रावर फेरमतदान करण्याची मागणी केलीय. त्यामुळे विरोधकांच्या या मागणींवर निवडणूक आयोग काय निर्णय घेणार? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.