आंबेडकरांच्या एन्ट्रीने लढत चुरशीची, सोलापुरात सद्यस्थिती काय?
सोलापूर : काँग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या सोलापूर लोकसभा मतदार संघात काँग्रेसला यंदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा आपला गड राखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ट करावी लागणार आहे. सोलापूर लोकसभा निवडणूक यंदाच्या वर्षी मोठी चुरशीची आणि वेगळ्याच वळणावर घेऊन जाणारी ठरते आहे. सोलापूरच्या लोकसभा निवडणुकीची प्राश्वभूमी पाहता प्रथमच तिरंगी आणि तुल्यबळ उमेदवारांमध्ये लढत होत आहे. काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे, वंचित आघाडीचे नेते […]
सोलापूर : काँग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या सोलापूर लोकसभा मतदार संघात काँग्रेसला यंदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा आपला गड राखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ट करावी लागणार आहे. सोलापूर लोकसभा निवडणूक यंदाच्या वर्षी मोठी चुरशीची आणि वेगळ्याच वळणावर घेऊन जाणारी ठरते आहे. सोलापूरच्या लोकसभा निवडणुकीची प्राश्वभूमी पाहता प्रथमच तिरंगी आणि तुल्यबळ उमेदवारांमध्ये लढत होत आहे. काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे, वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबडेकर आणि भाजपचे डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य या तिघांमध्ये लढत होत असून, या तिघांच्या नावावर सर्वधर्मसमभाव, जात आणि धर्म याच गोष्टीवर शिक्कामोर्तब झाल्याचे मतदार संघातील चित्र आहे . मात्र यामुळे विकासाचे मुद्दे मात्र मागे पडले आहेत. त्यामुळे मतदारराजा सुद्धा तितकाच द्विधा मनस्थितीत अडकला आहे.
सोलापूर म्हणजे महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमेवर वसलेले बहुभाषिक लोकांचे शहर. मोठ्या प्रमाणात असणाऱ्या कामगारामुळे कामगारांचे शहर अशी सुद्धा ओळख. अनेक जाती धर्माचे लोक मोठ्या गुण्यागोविंदाने इथे राहतात. अनेक जाती धर्माचे लोक राहत असल्याने महापुरुषांच्या जयंत्या आणी उत्सव सुद्धा मोठ्या प्रमाणात साजरा करणारा हा शहर. पुणे, नाशिक नंतर झपाट्याने वाढणारा या शहरात सध्या तिरंगी लढत होत आहे आणि तेही मोठ्या चुरशीची.
आपल्या नशिबात पराभव नसल्याचा छातीठोक पणे सांगणाऱ्या काँग्रेसच्या सुशीलकुमार शिंदे यांचा 2014 च्या मोदी लाटेत पराभव झाला. त्यानंतर पाच वर्ष विकास आणि डिजिटल इंडियाच्या गप्पा मारणाऱ्या भाजपने विद्यमान खासदार शरद बनसोडेंचा पत्ता कट केला. मतदार संघातील लिंगायत मतांची संख्यावर डोळा ठेवून धार्मिक मुद्दा पुढे आणून डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्याना उमेदवारी देऊन त्यांना निवडणूक रिंगणात उतरवले.
वाचा : सुशीलकुमार शिंदे प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला
दुसरीकडे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पराभवाची चव राखणाऱ्या काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनी पराभवाचा वचपा काढण्यासाठी मैदानात उतरले आहेत. मुळात सोलापूर लोकसभा म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला अशी ओळख आहे. 2014 च्या मोदी लाटेत ढासळलेला बुरुज पुनःप्रस्थापित करण्याचे मोठे आवाहन सुशीलकुमार शिंदे यांच्यासमोर आहे. म्हणूनच ते आता मोठ्या जिद्दीने राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि इतर समविचारी पक्षाना घेऊन मतदार संघात शड्डू ठोकला आहे. केंद्र सरकारचे विविध क्षेत्रातले अपयश, केंद्र सरकारच्या धोरणावर टीका-टिप्पणी करत प्रचारात थेट मोदींनाच आपला निशाणा बनविला आहे. तर कधी आपली ही शेवटची निवडणूक असल्याचं साद हि शिंदे घालत आहेत.
सोलापूर लोकसभा मतदार संघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी निवडणूक होईल असा अंदाज असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदेसमोरच मोठं आवाहन उभं केलंय. नवबौद्ध, त्यातील पोटजाती आणि आंबेडकरी चळवळीचे नेते आणि एमआयएम पक्ष्याची मोट बांधली आहे. त्यात शहरातील पूर्व भागात मोठे प्राबल्य असणाऱ्या माकपने पाठिंबा दिल्यामुळे प्रकाश आंबेडकरांचे पारडे जड झालं आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबडेकर यांच्या पारड्यात पडणारी मते ही काँग्रेसची परंपरागत मते असल्यामुळे शिंदेच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांची उमेदवारी शिंदे यांची डोकेदुखी झाली आहे.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबडेकरांना पाहण्याचा योग आला नाही. मात्र त्यांच्या माझ्या भीमाच लेकरु म्हणून त्यांच्या वंशज असलेले प्रकाश आंबडेकरांना पसंती असल्याचं आंबेडकरी चळवळीचे नेते सांगत आहेत.
प्रत्यक्ष मतदानाला काही दिवस शिल्लक आहेत. तीनही प्रमुख उमेदवारांकडून प्रचार केला जात आहे. तिघांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे. विकासाचे मुद्दे बाजूला राहून जात, धर्म यावरच या निवडणुका होतात की काय असं राजकीय विशलेषकाना वाटतंय.
सत्तेच्या सारीपाटावर विराजमान होण्यासाठी तिघेही उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांकडून मोठा प्रचार केला जातो आहे. त्यामुळे मतदाराराजा या तिघांपैकी कोणाला कौल देतो हे येत्या 23 मे रोजी स्पष्ट होईलच.