शिंदे गट बीकेसीवर तर शिवसेनेचा दसरा मेळावा कुठे?; ‘हे’ आहेत चार पर्याय
शिवाजी पार्कवरील मैदानाची परवानगी नाकारली तर शिवसेनेसमोर काय पर्याय असणार? असा सवाल केला जात आहे. परवानगी मिळाली नाही तर शिवसेना ऑनलाईन मेळावा घेणार की दुसरं मैदान शोधणार असाही सवाल केला जात आहे.
मुंबई: शिवसेनेची (shivsena) दसरा मेळाव्याची परंपरा यंदा खंडित होण्याची चिन्हे दिसत आहे. मुंबई महापालिकेने शिवसेना आणि शिंदे गट या दोघांनाही शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी नाकारली आहे. त्यामुळे शिवसेनेची कोंडी झाली आहे. दसरा मेळावा (dussehra rally) घ्यावा तर कुठे घ्यावा? अशी शिवसेनेची स्थिती झाली आहे. शिंदे गटाने आधीच बीकेसी मैदान (bkc ground) बुक केलं आहे. शिवसेनेला शिवाजी पार्क मैदान मिळणार नाही, त्यामुळे शिवसेनेचा मेळावा कुठे होणार? अशी चर्चा सुरू झाली आहे. तसेच शिवसेना कुठे मेळावा घेणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.
शिवसेनेने शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी अर्ज केला होता. त्यापाठोपाठ शिंदे गटानेही आम्हीच खरी शिवसेना असल्याचं सांगत शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची परवानगी मागितली होती. त्यामुळे महापालिकेची कोंडी झाली होती. तसेच शिवाजी पार्क मैदानावरून शिवसेना आणि शिंदे गट आमनेसामने आले होते. त्यामुळे हे मैदान कुणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यातच मुंबई पोलिसांनी महापालिकेला एक अहवाल दिला आहे. त्यात दसरा मेळाव्यासाठी हे मैदान कुणालाही देऊ नका, असं म्हटलं आहे.
पोलिसांनी आपल्या अहवालात कायदा सुव्यवस्थेचं कारण दिलं आहे. शिंदे गट आणि शिवसेनेतील वादामुळे तणावासारखी परिस्थिती आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. परिणामी कोणत्याही गटाला हे मैदान देण्यात येऊ नये, असं पोलिसांच्या अहवालात म्हटलं आहे.
शिवसेनेसमोर पर्याय काय?
शिवाजी पार्कवरील मैदानाची परवानगी नाकारली तर शिवसेनेसमोर काय पर्याय असणार? असा सवाल केला जात आहे. परवानगी मिळाली नाही तर शिवसेना ऑनलाईन मेळावा घेणार की दुसरं मैदान शोधणार असाही सवाल केला जात आहे. शिवाजी पार्कवर मेळावा घेता आला नाही तर शिवसेनेसमोर गोरेगावच्या नेस्को संकुलाचा एक पर्याय आहे. दुसरा महालक्ष्मीचं रेसकोर्स मैदान हा सुद्धा पर्याय असू शकतो. त्या शिवाय आझाद मैदान हा सुद्धा शिवसेनेसाठी एक पर्याय ठरू शकतो, असं सूत्रांचं म्हणणं आहे.
दरम्यान, आज शिवाजी पार्क मैदानाबाबत कोर्टात सुनावणी होणार आहे. कोर्ट काय निर्णय देते यावरही शिवसेनेचा पुढचा निर्णय अवलंबून असणार असल्याचं सांगितलं जात आहे.