Yugendra Pawar : अजितदादा आत आले, त्यावेळी रेवती बाहेर, तिचा राग आहे का? यावर युगेंद्र पवार असं म्हणाले की…
Yugendra Pawar : आज महाराष्ट्राला एक वेगळं चित्र पहायला मिळालं. अजित पवार थेट सहकुटुंब दिल्लीतील शरद पवार यांच्या निवासस्थानी गेले. त्यांनी शरद पवारांची भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या सगळ्या राजकीय घडामोडींवर बारामतीत अजित पवारांविरोधात निवडणूक लढवणारे युगेंद्र पवार व्यक्त झाले आहेत.
आज दिल्लीत एक मोठी घटना घडली. शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख आणि त्यांचे पुतणे अजित पवार सहकुटुंब शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने ही एक मोठी बाब आहे. राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर शरद पवार-अजित पवारांमध्ये टोकाचे मतभेद दिसून आले. व्यक्तीगत पातळीवर टीका टिप्पणी झाली. त्यानंतर आज अजित पवारांनी शरद पवारांच्या निवासस्थानी येणं ही मोठी बाब आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवणारा त्यांचा सख्खा पुतण्या युगेंद्र पवार यांनी या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे.
“मी दरवर्षी वाढदिवशी आजोबांना भेटायला जातो. आता संसद चालू आहे. म्हणून दिल्लीत आलो. साहेबांना भेटलो” असं युगेंद्र पवार म्हणाले. अजित पवारांच्या भेटीबद्दलही युगेंद्र पवार बोलले. “अजित पवार कुटुंबासह आले होते. खरतर ते येणार हे मला माहित नव्हतं. कौटुंबिक संबंध वेगळे आहेत. साहेबांचा आज 85 वा वाढदिवस आहे, त्या निमित्ताने भेटलं पाहिजे, या भावनेने ते आले असतील” असं युगेंद्र पवार म्हणाले.
‘कोणी पातळी सोडली नाही’
राजकारणात आता दोघांनी एकत्र यावं अशी कार्यकर्त्यांची भावना आहे, त्यावर युगेंद्र पवार म्हणाले की, “कार्यकर्त्यांची तशी भावना असू शकते. मी यावर कसं बोलणार, पक्षाचे ज्येष्ठ नेते याबद्दल ठरवतील” निवडणुका परस्परांविरोधात लढवल्या, निवडणूककाळात प्रचंड टीका झाली, त्यावर युगेंद्र पवार म्हणाले की, “एवढी जबरदस्त टीका दोन्ही बाजूंनी झाली नाही. कोणी पातळी सोडली नाही. राजकारण एकाबाजूला, विचार वेगळे असतील. पण कुटुंब म्हणून एकत्र आलं पाहिजे”
ही भेट राजकीय होती की, कौटुंबिक?
ही भेट राजकीय होती की, कौटुंबिक? त्यावर 100 टक्के ही भेट कौटुंबिक होती, असं उत्तर त्यांनी दिलं. दादा आत आले, त्यावेळी रेवती आणि सदानंद सुळे हॉलच्या बाहेर होते, रेवतीचा राग आहे का? त्यावर युगेंद्र पवार म्हणाले की, “असं काही नाहीय. रेवतीचा राग वैगेर अजिबात काही नाही. तिचा काय संबंध? माझी लहान बहिण आहे”
म्हणून सगळेच आत आले
छगन भुजबळ, सुनील तटकरे कुटुंबाचे सदस्य नाहीत ते सुद्धा आलेले. त्यावर युगेंद्र पवार म्हणाले की, “काही लोक खासदार आहेत, काही आमदार आहेत. काही मंत्री होणार आहेत. त्यांना बाहेर थांबवणं योग्य नाही, म्हणून सगळे आत आले”