छगन भुजबळ यांची तोफ धडाडली, शरद पवार यांना एकच सवाल; अडचण वाढणार?
राहुल गांधी म्हणतात जनगणना करा, शरद पवारही म्हणतात जनगणना करा. अजित पवारही म्हणतात होऊ द्या खर्च. जनगणना करा. आमचंही तेच मत आहे. जनगणना झाली पाहिजे. दादा, आपण जनगणनेची मागणी केली आहे. आपल्या आमदारांनीही त्याचा ठराव केला पाहिजे. इतर राज्य करतात, महाराष्ट्रात जनगणना करण्यासाठी अडचण काय आहे? असा सवाल राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे.
कर्जत | 1 डिसेंबर 2023 : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची तोफ आज पुन्हा धडाडली. छगन भुजबळ यांनी आज मनोज जरांगे पाटील यांना नाही तर थेट शरद पवार यांना घेरलं आहे. तुम्ही केलं ते बरोबर आणि आम्ही केलं तर चूक कसं काय? असा सवाल छगन भुजबळ यांनी केला. शरद पवार यांनी भाजपसोबत अनेकदा युतीची चर्चा केली. त्यावरूनही छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच शरद पवार यांच्या धरसोडीच्या राजकारणावर थेट हल्ला चढवला.
अनेकदा भाजपला युतीचा प्रस्ताव दिला. चर्चा झाल्या. एकदा नाही अनेकदा झालं. आम्ही काय वेगळं केलं? आम्ही आमचा पक्ष सोडला नाही. आम्ही विचारधारा बदलली नाही. आम्ही मार्ग बदलला नाही. जयललिता, नवीन पटनायक, मेहबुबा मुफ्तीही भाजपसोबत गेल्या होत्या. भाजपसोबत गेले म्हणून त्यांची विचारधारा बदलली का? ते त्यांच्या विचारधारेने काम करत आहेत. आम्ही भाजपच्या सरकारमध्ये गेलो. त्याआगोदर आम्ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या सरकारमध्ये गेलो. म्हणजे आम्ही शिवसेनेचे झालो का? नाही. आम्ही आमची विचारधारा बदलली का? नाही. तिकडे बसलो तर चालतं. इकडे बसलं तर नाही चालत का? तुम्ही केलं ते बरोबर. आम्ही केलं ते चूक, हे कसं काय? असा सवाल छगन भुजबळ यांनी शरद पवार यांना केला.
मला थोड्या गोष्टी माहीत
तुम्ही 5-6 वेळा भाजपसोबत जाऊ असं म्हणाला होता. एखाद्या पक्षाला आधी हो म्हणून नंतर नकार देणं हे एकदा ठिक आहे. वारंवार कशाला? वारंवार भूमिका बदलणं चुकीचं आहे. 2004पासून काही तरी सुरूच होतं ना. काही गोष्टी प्रफुल्ल पटेल यांना माहीत आहेत. काही गोष्टी अजितदादांना माहीत आहेत. मला थोड्या गोष्टी माहीत आहेत, असा चिमटा भुजबळ यांनी काढला.
जनतेचा निर्णयावर शिक्कामोर्तब
ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. त्यात जनतेने दाखवून दिलं. भाजप मोठा पक्ष आहे. त्यानंतर दोन नंबरचा पक्ष राष्ट्रवादी ठरला आहे. ही समान्य लोकांची ही पावती आहे. खासदारकी नाही, आमदारकी नाही, जिल्हापरिषदेचीही नाही, ही ग्रामपंचायतीची निवडणूक आहे. सामान्यांची निवडणूक आहे. जनतेनेही आपल्या निर्णयावर शिक्कामोर्तब केला आहे. तुम्ही जे काही केलं आहे, ते बरोबर आहे. महाराष्ट्र तुमच्यासोबत आहे. यावर जनतेने शिक्कामोर्तब केलं आहे, असंही ते म्हणाले.