एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस, आवडते मुख्यमंत्री कोण? अमृता फडणवीस यांच्या प्रश्नावर राज ठाकरे यांचं स्पष्ट उत्तर
राज ठाकरे यांना मुलाखती दरम्यान रॅपिड फायरच्या सत्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापैकी आवडते मुख्यमंत्री कोण? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली.
मुंबई : ‘लोकमत’च्या पुरस्कार सोहळ्यात आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अनोखी मुलाखत आयोजित करण्यात आली. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ही मुलाखत घेतली. या मुलाखतीत राज ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर मनमोकळेपणाने भूमिका मांडली. या मुलाखती दरम्यान रॅपिड फायरच्या सत्रात त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापैकी आवडते मुख्यमंत्री कोण? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली.
“एकनाथ शिंदे हे आताच मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांना मुख्यंमत्री म्हणून ठसा उमटवायचा आहे. पण महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभावशाली मुख्यमंत्री म्हणून मी पाहिले असतील तर ते दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते. मी रितेश इथे बसलाय म्हणून बोलत नाहीय. देवेंद्र फडणवीस आहेत. मी पाहिल्यांपैकी मुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार. मनोहर जोशी यांनी तो आब राखला. पण कामाचा झपाटा नारायण राणे यांच्याकडे बघितला. सत्तेचा साबण खूप वेगळा असतो. अंगाला काही लागलं की, सत्तेजवळ जातात, घासून पुसून घेतात आणि स्वच्छ होऊन जातात. हे आधीही पाहिलं आणि नंतरही आपण पाहिलं आहे. त्यामुळे तसा काही फरक दिसत नाही”, असं उत्तर राज ठाकरे यांनी दिलं.
अमृता फडणवीस यांचे प्रश्न, राज ठाकरे यांचे मिश्किल उत्तरे
अमृता फडणवीस : राजकारणी मंडळी खूप खालच्या स्तरावर जाऊन एकमेकांवर टीका करत आहेत. याला लोकं कंटाळले आहेत. यात मीडिया पुढाकार घेऊ शकते, असं तुम्हाला वाटतं का? नॉटी लोकांच्या घरी जाऊन प्रतिक्रिया घेणे बंद केलं पाहिजे का?
राज ठाकरे : मी यावेळी अनेकदा बोललोय की तुम्ही दाखवताय म्हणून ते बोलत आहेत. तुम्ही हे बंद केलं पाहिजे. पण त्यांचा शेवटी टीआरपीचा विषय असतो. मी टीआरपीचं काही करु शकत नाही.
अमृता फडणवीस : राजकारणत खूप टाळी देणं आणि डोळे मारणं चाललं आहे. राहुल गांधी यांनी मोदीजींना मिठी मारली. मग डोळा मारला. अजित पवार यांनी उद्धव ठाकरेंच्या हातात माईक दिला आणि डोळा मारला. याबाबत आपला काय प्लॅन आहे?
राज ठाकरे : डोळे मारायचा काय प्लॅन? ज्या वयातल्या गोष्टी त्या वयात करायच्या असतात. त्यांच्या काही गोष्टी राहून गेल्या असतील. त्यामुळे ते आता करत आहेत.
अमृता फडणवीस : मला न्यूज चॅनलवरुन कळतं. तुम्ही कधी राष्ट्रवादीच्या जवळ दिसता, कधी शिवसेना तर तर कधी भाजपला टाळी देता. आता हम साथ साथ है कोणाबरोबर आणि केव्हा करणार?
राज ठाकरे : काय आता तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी म्हणून बोलत नाही आहातच. तर आता मी बोलूनच टाकतो. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीही सध्या कोणाबरोबर आहेत तेच कळत नाही.
अमृता फडणवीस : ते खूप लॉयल आहेत
राज ठाकरे : कारण काय, ते पहाटेच गाडी घेऊन करुणाकडे जातात. मग तुम्हाला कित्येकदा पत्ता नसतो. कधीतरी ते शिंदेंबरोबर असतात. कधीतरी अजित पवारांचा चेहरा उतरलेला दिसतो. कुणाला भेटणं, बोलणं ही बातमी झालीय. राजकारणातला मोकळेपणा मीडियाने घालवला. त्या सगळ्या गोष्टींना अर्थ नाही. कुणी कुणाला भेटलं तर युती आणि आघाडी होत नसतात.