भाजप-तृणमूलच्या वादात ज्यांचा पुतळा फोडला, ते ‘ईश्वरचंद्र विद्यासागर’ कोण होते?
कोलकाता : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादारम्यान पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप असा राडा सुरु आहे. भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या रोड शोमध्ये दगडफेक झाली. या दगडफेकीदरम्यान ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याचीही तोडफोड झाली. हा पुतळा भाजपने तोडल्याचा दावा तृणमूलचा आहे, तर भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर होते, मग कंपाऊंडच्या आतला पुतळा कसे तोडतील, असा प्रश्न अमित शाह […]
कोलकाता : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादारम्यान पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप असा राडा सुरु आहे. भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या रोड शोमध्ये दगडफेक झाली. या दगडफेकीदरम्यान ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याचीही तोडफोड झाली. हा पुतळा भाजपने तोडल्याचा दावा तृणमूलचा आहे, तर भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर होते, मग कंपाऊंडच्या आतला पुतळा कसे तोडतील, असा प्रश्न अमित शाह यांनी केला. ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याचा मुद्दा आता पश्चिम बंगालमध्ये उफाळून आला आहे. सोशल मीडियावरही ईश्वरचंद्र विद्यासागर कोण होते याबाबतही सर्च केलं जात आहे.
कोण होते ईश्वरचंद्र विद्यासागर?
26 सप्टेंबर 1820 रोजी पश्चिम बंगालमधील मोदीनीपूर येथील ब्राह्मण कुटुंबात ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा जन्म झाला. पुढे आपल्या शिक्षण आणि कार्यावर थोर समाजसुधारक म्हणून भारतासह अवघ्या जगाला त्यांची ओळख झाली. शिक्षणतज्ञ आणि स्वातंत्र्यसेनानी म्हणूनही त्यांचं योगदान मोठं आहे.
इंग्रजी आणि संस्कृत भाषा ईश्वरचंद्र विद्यासागर यांना अवगत होत्या. त्यामुळे प्राचीन भारतीय संस्कृती आणि पाश्चिमात्य परंपरेचा विशेष अभ्यास केला होता.
गावात प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर ईश्वरचंद्र वडिलांसोबत कोलकात्याला आले. तिथे त्यांना स्कॉलरशिप मिळाली आणि त्या अंतर्गत शिक्षण घेऊन ‘विद्यासागर’ पदवी मिळवली. 1839 साली ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं. 1840 साली म्हणजे वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी फोर्ट विलियम कॉलेजमध्ये संस्कृत विभागाचे प्रमुख म्हणून काम सुरु केलं. पुढे 1849 साली ते पुन्हा साहित्य विषयाचे प्राध्यापक झाले आणि पुन्हा एकदा संस्कृत भाषेशी जोडले गेले.
स्थानिक भाषेतून शिक्षण आणि मुलींच्या शिक्षणासाठी ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी शाळा सुरु केल्या. कोलकात्यात मेट्रोपोलिटन कॉलेजचीही स्थापना विद्यासागर यांनी केली. शाळा, कॉलेज चालवण्यासाठी ते शालेय पुस्तकांची विक्री करत असत.
संस्कृत कॉलेजचे प्राचार्य बनल्यानंतर त्यांनी सर्व जातीतल्या मुलांना महाविद्यलयीन शिक्षणाचे दरवाजे उघडले. त्या काळात ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा हा निर्णय क्रांतिकारी होता.
ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी समाजसुधारणेच्या क्षेत्रातही प्रचंड काम केले. विद्यासागर यांच्या प्रयत्नामुळेच 1856 साली विधवा पुनर्विवाह कायदा मंजूर झाला. केवळ बोलण्यापेक्षा कृतीवर त्यांचा अधिक भर होता. कदाचित म्हणूनच त्यांनी स्वत:च्या मुलाचं लग्न एका विधवा महिलेशी केलं. याचसोबत, विद्यासागर यांनी बहुपत्नी प्रथा आणि बालविवाह प्रथेविरोधात आवाज उठवला.
सर्व जाती-धर्मातील मुलांना शिक्षण मिळावं, स्त्रियांना त्यांचे हक्क मिळावेत, यासाठी आपलं आयुष्य वेचणाऱ्या आणि प्रसंगी क्रांतिकारी निर्णय घेणाऱ्या ईश्वरचंद्र विद्यासागर यांचं 1891 साली निधन झालं.