Sada Sarvankar Mahim : मनसेला सदा सरवणकरांची इतकी धास्ती का?
Sada Sarvankar Mahim : माहीम विधानसभा मतदारसंघात अमित ठाकरे यांच्याविरोधात उभे असलेले शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर कोण आहेत? त्यांचा राजकीय प्रवास कसा आहे? सदा सरवणकरांची मनसेने इतकी धास्ती का घेतलीय? त्यांनी माघार घ्यावी यासाठी का प्रयत्न सुरु आहेत? त्यांची मतदारसंघातील ताकद किती? जाणून घ्या.
माहीममधून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे निवडणूक लढवत आहे. अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यामुळे माहीम विधानसभेची निवडणूक चर्चेचा विषय बनली आहे. अमित ठाकरे यांनी माहीम विधानसभा मतदारसंघातून आज उमेदवारी अर्ज दाखल केला. माहीमध्ये अमित ठाकरेंसमोर शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर, ठाकरे गटाचे महेश सावंत यांचं आव्हान आहे. लोकसभा निवडणुकीच्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यामुळे माहीम आणि शिवडी या दोन मतदारसंघात महायुती मनसेला पाठिंबा देणार अशी चर्चा आहे. शिवसेना शिंदे गटाकडून माहीममधून सदा सरवणकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. आता सदा सरवणकर यांनी माघार घ्यावी यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरु आहेत. स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदा सरवणकरांशी चर्चा केली. पण सदा सरवणकर विधानसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत.
सदा सरवणकर यांची उमेदवारी कायम राहिल्यास अमित ठाकरे यांचा विधानसभेत पोहोचण्याचा मार्ग कठीण बनेल. त्यामुळे सदा सरवणकर यांनी माघार घ्यावी, यासाठी वरिष्ठ पातळीवरुन प्रयत्न सुरु आहेत. आतापर्यंत शिवसेनेत असताना सदा सरवणकर यांनी दोनवेळा बंडखोरी केली आहे. माहीम विधानसभा मतदारसंघात प्रभादेवी, दादर, माटुंगा आणि माहीमचा भाग येतो. माहीम हा मराठी बहुल मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला राहीला आहे. आता शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर ताकद विखुरली गेली आहे.
सदा सरवणकर कोण?
सदा सरवणकर हे प्रभादेवी, दादरमधील एक मोठ नाव आहे. तळागाळात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. सामान्य शिवसैनिक ते नगरसेवक, आमदार असा आतापर्यंतचा त्यांचा प्रवास राहिला आहे. सदा सरवणकर यांची मतदारसंघात स्वत:ची एक ताकद आहे हे नाकारुन चालणार नाही. 1992 ते 2004 अशी तीनवेळा त्यांनी नगरसेवक पदाची निवडणूक जिंकली. 2004 साली पहिल्यांदा त्यांना विधानसभेच तिकीट मिळालं. ते आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 2009 साली शिवसेनेने त्यांना तिकीट नाकारलं. त्यामागे स्थानिक राजकारण होतं. त्यावेळी त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली. त्यांचा पराभव झाला. नितीन सरदेसाई यांच्या रुपाने माहिममधून पहिल्यांदा मनसेचा आमदार निवडून आला.
मतदारसंघात त्यांचं वजन
2012 साली सरवणकरांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. 2014 मध्ये त्यांनी पुन्हा शिवसेनेची उमेदवारी मिळवली. पुन्हा निवडून विधानसभेवर गेले. 2019 मध्ये तिसऱ्यांदा आमदार बनले. 2022 साली शिवसेनेत फूट पडली. त्यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंना साथ दिली. आता त्यांना 2024 विधानसभेसाठी शिवसेनेने पुन्हा उमेदवारी जाहीर केलीय. पण त्यांचं मतदारसंघातील वजन लक्षात घेता त्यांनी माघार घ्यावी, यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरु आहेत.