मुंबई : शिवसेनेच्या यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांचा निकटवर्तीय सईद खान (Saeed Khan) याला अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने (Enforcement Directorate – ED) अटक केली होती. त्याला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे. कथित मनी लाँड्रिंग अर्थात पैशांच्या अफरातफरी प्रकरणात भावना गवळी यांचा निकटवर्तीय असलेल्या सईद खानला अटक करण्यात आल्याने खासदार गवळी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
Saeed Khan, a close aide of Shiv Sena leader Bhavana Gawali, was arrested by the Enforcement Directorate, in connection with an alleged money laundering case. He will be presented before the court today. pic.twitter.com/wcvQtPcJS9
— ANI (@ANI) September 28, 2021
भावना गवळी यांचा जन्म 23 मे 1974 रोजी वाशिम येथे झाला. माजी खासदार स्व. पुंडलिकराव गवळी यांच्याकडून भावना गवळी यांना राजकारणाचे बाळकडून मिळाले. त्या पुंडलिकराव गवळी यांच्या सर्वात लहान कन्या आहेत. पुंडलिकराव गवळी यांनी सुरुवातीपासूनच आपल्या चारही मुलींना प्रोत्साहन दिले. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत भावना गवळी यांनी लहान वयातच राजकारणात प्रवेश केला. वडिलांच्या निधनानंतरही भावना गवळी यांनी त्यांच्या राजकारणाचा वसा समर्थपणे पुढे नेला.
लहान वयातच राजकीय क्षेत्रात उतरलेल्या भावना गवळी यांनी 1999 मध्ये वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी लोकसभेत प्रवेश केला. यानंतर 2004, 2009, 2014 आणि आता 2019 असे सलग पाचव्यांदा लोकसभा निवडणुकात विजय मिळवून उत्तरोत्तर राजकारणातील आपले स्थान भक्कम केले. दांडगा जनसंपर्क आणि कोणत्याही आव्हानाला थेटपणे भिडण्याची धमक या भावना गवळी यांच्या जमेच्या बाजू मानल्या जातात. गेल्या 20 ते 22 वर्षांच्या काळात भावना गवळी यांनी यवतमाळ-वाशिम मतदारसंघातील पाण्यापासून इतर अनेक समस्या सोडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे उकरून काढण्यात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा हातखंडा आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी एका प्रकरणात भावना गवळी यांच्यावर आरोप केले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून विदर्भातील रस्तेबांधणीच्या कार्यक्रमात शिवसेनेचे काही नेते अडथळे आणत असल्याचे म्हटले होते. यावरुन किरीट सोमय्या यांनी भावना गवळी यांनी 100 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता.
या आरोपांना प्रत्युत्तर देताना भावना गवळी यांनी म्हटले होते की, किरीट सोमय्या यांनी माझ्यावर केलेले आरोप चुकीचे आहेत. एकेकाळी ते आमचे सहकारी होते. मात्र, त्यांनी माझ्यासमोर येऊन कोणता भ्रष्टाचार झाला आहे, हे सांगावे. तेव्हा मी त्यांना उत्तर देईन, असे भावना गवळी यांनी म्हटले होते.
तसेच आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही भेटणार असल्याचे भावना गवळी यांनी सांगितले होते. वाशिम जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे. परंतु, काही लोक चुकीच्या पद्धतीने केंद्रीय मंत्र्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मी नितीन गडकरी यांना प्रत्यक्ष भेटून हे गैरसमज दूर करणार असल्याचे भावना गवळी यांनी म्हटले होते.
संबंधित बातम्या :
शिवसेना नेते ईडीच्या निशाण्यावर, भावना गवळींचा निकटवर्तीय सईद खानला ईडीकडून अटक
परळीत पुढील 10 निवडणुकांमध्ये धनंजय मुंडेंना कोणीही रोखू शकणार नाही : जयंत पाटील
विदर्भातील शिवसेनेच्या सामर्थ्यवान नेत्या, वन वुमेन आर्मी, जाणून घ्या कोण आहेत भावना गवळी?