छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधणारा ‘महात्मा’ तरी कोण? श्रेय वादानंतर कोण होतंय लोकमान्य?

Chhatrapati Shivaji Maharaj : युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचेच नाही तर राष्ट्राचे आराध्य आहेत. पण महाराजांच्या इतिहासासंबंधी अकारण वादाचे उद्योग करण्यात येतात. पुण्यात सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यावरुन आता महाराजांची समाधी कोणी शोधली यावरून पुन्हा चर्चा होत आहे. काय आहे हा वाद? काय सांगतो इतिहास?

छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधणारा 'महात्मा' तरी कोण? श्रेय वादानंतर कोण होतंय लोकमान्य?
महात्मा फुले आणि लोकमान्य टिळक
Follow us
| Updated on: Sep 11, 2024 | 1:57 PM

युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज हे संबंध महाराष्ट्राचेच नाही तर राष्ट्राचे प्रेरणास्थान आहेत. त्यांनी गुलामगिरीच्या साखळ्या खंडित करत सर्वसामान्य जनतेचे स्वराज्य निर्माण केले. चोहोबाजूंनी शत्रूंनी घेरलेले असताना स्वराज्य निर्मिती केली. या राष्ट्रात अस्मिता, स्वाभिमानाचे स्फुलिंग चेतवले. या स्वराज्याला नैतिकतेचे अधिष्ठान होते. मागील कित्येक हजार वर्षात जगाच्या इतिहासात असा युगपुरूष घडला नाही. त्यांच्या प्रेरणेनेच पुढे मराठ्यांनी देशभरात मोठा पराक्रम गाजवला. मुर्दुमकी गाजवली. पण आता महाराजांच्या इतिहासासंबंधी अकारण वादाचे उद्योग करण्यात येतात. पुण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यावरुन आता महाराजांची समाधी कोणी शोधली यावरून पुन्हा चर्चा होत आहे. ही समाधी महात्मा ज्योतिबा फुले यांनी शोधली की लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी शोधली यावरुन वादाचा प्रयत्न करण्यात येत आहे. काय आहे हा वाद? काय सांगतो इतिहास?

मोहन भागवत यांचं वक्तव्य काय?

पुण्यात तंजावरचे मराठे या पुस्तकाचं मोहन भागवत यांनी प्रकाश केले. त्या कार्यक्रमात त्यांच्या एका विधानाने राज्यात गहजब उडाला. शिवाजी महाराजांचं राज्य किती होतं? आज सरकारी महाराष्ट्र आहे, तेवढंही नव्हतं, असं भागवतांनी दावा केला. स्वराज्याचा तेव्हाचा नकाशा मात्रा वेगळाच दावा करतो, त्याचे वाचन भागवतांनी करावं, असा टोला इतिहास अभ्यासकांनी त्यांना लगावला आहे. शिवाजी महाराज इंग्रजांविरुद्ध लढले. शिवाजी महाराज इथेच होऊन गेले. त्यांचं स्मरण व्हावं आणि जागरण व्हावं म्हणून रायगडावर उत्सव सुरू केला. टिळकांनी ते सर्व शोधून काढलं, असं ते म्हणाले. यापूर्वी सुद्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका सभेत टिळकांनी शिवाजी महाराजांची समाधी शोधल्याचा दावा केला होता. इतिहासातील काय आहे घडामोड?

हे सुद्धा वाचा

युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराजांच्या देहावसानानंतर छत्रपती संभाजी महाराज यांनी महाराजांची समाधी बांधली. त्यानंतर स्वराज्यासाठी धामधुमीचा काळ ठरला. पुढे मराठा पातशाही स्थिर स्थावर झाल्यावर रायगडावरील समाधीकडे दुर्लक्ष झाले. आपल्याकडे इतिहासाविषयी कायम अनस्था दिसून आली. त्यात या समाधीचा पुढील सर्व राज्यकर्त्यांना विसर पडला. मधात मोठा कालखंड लोटला. त्यानंतर इंग्रजांनी रायगड ताब्यात घेतला. त्यानंतर रायगडावरील राबता ओसरला.

इतिहासातील घडामोड काय?

इंग्लंडमधील जेम्स डगलस हा इतिहास अभ्यासक होता. महाराजांचा पराक्रम ऐकून तो भारतात आला. त्याने महाराजांची समाधी शोधण्यासाठी राजगडावर मुक्काम ठोकला. गडावर समाधी शोधण्याचा त्याने हरएक प्रयत्न केला. पण घनदाट झाडी आणि त्यावेळी साधनांच्या कमतरेमुळे त्याला त्यावेळी समाधी सापडली नाही. गडावर समाधी न मिळाल्याने तो अस्वस्थ झाला. मे 1869 मध्ये तो रायगडावर गेल्याचा दावा करण्यात येतो. त्याने उद्विग्न होऊन इंग्रजी वृत्तपत्रात लेख लिहिला. टाइम्स ऑफ इंडियातील हा लेख वाचून महात्मा ज्योतिबा फुले अस्वस्थ झाले. महात्मा फुले यांनी पुण्यात याविषयी सभा घेतली. एक इंग्रज शिवाजी महाराजांवर संशोधन करण्यासाठी इतक्या दूर आला. आपल्यावर ज्यांचे उपकार आहेत, त्या राजांची समाधी मिळू नये ही आपल्यासाठी शोकांतिका असल्याचे त्यांनी सभेत सांगितले. त्यावेळी अनेक तरुण समाधी शोधण्यासाठी त्यांच्यासोबत तयार झाले. त्यांनी थेट रायगड गाठले. खूप शोध घेतल्यावर त्यांनी महाराजांची समाधी शोधली. घाणेरीची आणि काटेरी झाडे तोडण्यात आली. या सर्व गोष्टीसाठी तीन ते चार दिवस लागले. लागलीच त्यांनी समाजी स्थळाची स्वच्छता केली. सोबत आलेल्या तरुणांनी पानं-फुलं आणली आणि महात्मा फुले यांनी ती समाधीवर वाहिली. जून 1869 मध्ये ही घटना असल्याचे मानले जाते. याच महिन्यातच शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. त्यामुळे या घटनेला महत्व प्राप्त झाले.

छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी सापडल्याची माहिती हाहा म्हणता म्हणता पुण्यात येऊन धडकली. जनतेला त्यामुळे एकच आनंद झाला. सगळीकडे चैतन्य पसरले. आता या आदर्श राजाचा गुणगौरव व्हावा आणि त्याचा कोणालाच विसर पडू नये यासाठी काहीतरी ठोस करण्याचे महात्मा ज्योतिबा फुले यांनी मनाशी निश्चित केले. त्यांनी लागलीच एक मोठी सभा घेतली. या सभेची नोंद तत्कालीन पोलीस रेकॉर्डला असल्याचे इतिहास संशोधक सांगतात. या सभेत तीन ठराव मंजूर करण्यात आले. त्यात पहिला ठराव शिव समाधीच्या जीर्णोधराचा ठराव झाला. शिवाजी महाराजांची जयंती साजरी करावी आणि शिवाजी महाराजांचे महान कार्य जनतेपर्यंत पोहचावे यासाठी साहित्य निर्मिती करावी. या तीनही ठरावाची लवकरच अंमलबजावणी झाल्याचे दिसते. इंग्रज अधिकाऱ्यांनी समाधीच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी निधी दिला. सार्वजनिक रक्कम सुद्धा जमवण्यात आली. त्यातून या समाधीची डागडुजी करण्यात आली. समाधीच्या देखभाल आणि दिवाबत्तीसाठी इंग्रजांनी एका अधिकाऱ्याची नेमणूक केली. त्यानंतर महात्मा फुले यांनी शिवजयंती साजरी करण्याचा पायंडा सुरु केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीसाठी इंग्रजांनी निधी दिला. लोकवर्गणीतून शिवजयंतीला सुरुवात झाली. महात्मा फुले यांनी शिवाजी महाराजांवर 1869 मध्येच दीर्घ पोवाडा लिहिला होता. “मराठीतलं शिवरायांबद्दलचं पहिलं पुस्तक जोतीरावांचं आहे. जून 1869 मध्ये ते प्रसिद्ध झाले. मुंबईतील ओरिएन्टल छापखान्यात छापलेले हे पुस्तक मुंबईत काळबादेवीला वासुदेव बाबाजी नवरंगे यांच्या तर पुण्यात स्वत: जोतीरावांच्या वेताळ पेठेतील (नंतरची गंज पेठ व सध्याची महात्मा फुले पेठ ) पुस्तकांच्या दुकानात विक्रीला ठेवलेले होते. त्याची किंमत अवघी सहा आणे ठेवण्यात आलेली होती”, अशी माहिती दिवंगत अभ्यासक प्रा. हरी नरके यांनी नोंदवलेली आहे.

महात्मा फुले हे 1880 मध्ये रायगडावर जाऊन आल्यावर पुढे सार्वजनिक शिवजयंतीचा उत्सव साजरा करण्यात येऊ लागला. पुणे येथे आल्यावर त्यांनी स्वारगेटजवळील हिराबागेत गंगारामभाऊ म्हस्के आणि चाफळकर स्वामी या मित्रांसोबत सत्यशोधक समाजातर्फे पहिली सार्वजनिक शिवजयंती साजरी केल्याचा उल्लेख सापडतो. पुण्यातील या उत्साही घडामोडीची नोंद कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे यांनी घेतली आहे. त्यांनी सुद्धा मुंबईत लालबाग परळ येथे शिवजयंती साजरी केली. शिवाय इंग्रजांच्या गुप्तहेर खात्याने शिव समाधी शोध सभेची नोंद आणि ठरावाची नोंद करून ठेवलेली आहे. पुढे दीनबंधूमध्ये शिवजयंती साजरी केल्याचे वृत्त आणि वाचकांच्या पत्रातून समोर येते.

महात्मा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी झाला झाला. तर लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी झाला. तत्कालीन या दोन्ही पुढाऱ्यांमध्ये जवळपास 30 वर्षांचे अंतर होते. 28 नोव्हेंबर 1890 रोजी महात्मा फुले यांचे पुणे येथे निधन झाले. महात्मा फुले यांनीच शिवाजी महाराजांची समाधी शोधली तर त्यांनीच पहिली सार्वजनिक शिवजयंती साजरी केल्याचे अनेक दस्तावेजातून स्पष्ट झाले आहे. राज्य सरकारच्या अख्त्यारित महात्मा फुले यांच्यावरील समग्र साहित्यात सुद्धा या नोंदी आढळतात. सार्वजनिक गणेशोत्सव भाऊसाहेब लक्ष्मण जावळे म्हणजेच भाऊसाहेब रंगारी यांनी 1892 साली सुरू केल्याचे समोर आले आहे. त्याविषयीचे एक स्फूट सुद्धा तत्कालीन केसरीत असल्याचे दिसून आले. त्यानंतर 1893/94 मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव आणि 1894 मध्ये मध्ये सार्वजनिक शिवजयंतीला त्यानंतर लोकमान्य टिळक काळात व्यापक स्वरुप आले असे आपल्याला म्हणता येईल.  भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळकांनी शिवजयंती संदर्भात काहीच प्रयत्न केले असे म्हणणे पण योग्य ठरणार नाही.  पुढे टिळकांच्या निधनानंतर 1927 च्या आसपास जीर्णोधराच्या कार्याला सुरुवात झाली. लोकवर्गणी, इंग्रज सरकार, पुरातत्व खातं यांनी त्यासाठी 19,000 रुपयांचा निधी दिल्याचे समोर येते.

समाधी विस्मृतीत का गेली?

छत्रपती संभाजी महाराज यांनी शिवाजी महाराजांची समाधी बांधली होती. मग ती पुढे विस्मृतीत कशी गेली हा मोठा प्रश्न समोर येतो. इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी एका मुलाखतीत याविषयीची हकिकत मांडली आहे. त्यानुसार, शिवाजी महाराजांच्या नंतर संभाजी महाराजांनी स्वराज्याची धुरा आपल्या हातात घेतली होती. पण संभाजी महाराज दुर्दैवाने मोगलांच्या कैदेत सापडले आणि त्यानंतर लगेचच सहा महिन्यांमध्ये रायगड किल्ला हा औरंगजेबाच्या ताब्यात गेला. त्यानंतर म्हणजे जवळजवळ 1690 ते 1733 इतक्यात मोठ्या कालावधीत म्हणजे जवळपास 50 वर्षे रायगड किल्ला पूर्णपणे हा मोगलांच्या ताब्यात होता. नंतर किल्ला सिद्दीकडे गेला. 1733 मध्ये साताऱ्याच्या शाहु महाराजांनी हा किल्ला सिद्दीकडून जिंकला. तो पुढे पोतणीसांकडे गेला. त्यांच्याकडून पेशव्यांनी जिंकून घेतला. 1818 मध्ये रायगड हा इंग्रजांनी पेशव्यांकडून जिंकून घेतला आणि त्या किल्ल्यावर सगळ्यांना येण्यास बंदी घातली आणि त्याच्यामुळे शिवाजी महाराजांची समाधी ही विस्मरणात गेली.

अनेक गोष्टी सातारच्या शाहू महाराजांच्या काळातली शिवसमालीच्या दिवाबत्तीच्या विषयीची असतील किंवा डागडुजी विषयीचे असतील काही कागदपत्र अजून पर्यंत उजेडात आलेली नाही. म्हणजे इतिहासात ते अंधारात असतील कदाचित पुण्यामध्ये जे दप्तर आहे शाहू दप्तर आहे त्याच्यामध्ये ती असू शकतील. त्याचा शोध घेतला पाहिजे. दुसरं पेशव्यांच्या कालावधीमध्ये शिवाजी महाराजांच्या समाधी विषयी त्यांनी काय केलेलं होतं याची काही कागदपत्र आपल्याकडे उपलब्ध नाही. त्यामुळे एवढी जी परकीय राजवट रायगड वर राहिली स्वराज्यानंतरची त्याच्यामुळे कदाचित ही शिव समाधी विस्मरणात गेली आणि ती लोकांच्या समोर आली नाही असं म्हणावं लागतं, असे सावंत यांनी स्पष्ट केलं.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.