वंचित आघाडी बरखास्त करून आमच्यासोबत या, मंत्रिपद देतो; प्रकाश आंबेडकर यांना कुणाची ऑफर?
आमचा विस्तार राहिला बाजूला राहिला आणि अजितदादांसाठी विस्तार झाला. आता 7-8महिने बाकी आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची आमची मागणी आहे. आमच्या रिपब्लिकन पार्टीला दोन मंत्री पद मिळावे अशी मागणी आहे. मी शिर्डीमधून लढणार आहे. याबाबत वरिष्ठांशी बोलणार आहे, असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितलं. ते सांगली दौऱ्यावर आले होते.
शंकर देवकुळे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, सांगली | 5 जानेवारी 2023 : प्रकाश आंबेडकर यांनी वंचित आघाडी बरखास्त करून आमच्यासोबत यावे. मी त्यांना माझ्या पक्षाचं अध्यक्षपद देतो. तसेच त्यांना माझं केंद्रीय मंत्रीपदही देतो, अशी ऑफरच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांना दिली आहे. रामदास आठवले हे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी मीडियाशी त्यांनी विविध मुद्द्यावर संवाद साधला. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना मराठा आरक्षणासाठी सरकारला वेळ देण्याचं आवाहनही केलं आहे.
प्रकाश आंबडेकर सक्षम नेते आहेत. वंचितने कुठे जावे हा त्यांचा प्रश्न आहे. ते महायुतीसोबत येणार नाहीत. पण ते महाविकास आघाडीत जाणार आहेत. त्यांनी महाविकास आघाडीला 12 जागांचा प्रस्ताव दिला आहे. महाविकास आघाडीने त्या जागा त्यांना द्यावात म्हणजे आम्हाला त्यांचे बारा वाजवणे सोपे जाईल, असं सांगतानाच डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांनी काढलेल्या पक्षाचे अध्यक्षपद आणि माझे मंत्रिपद मी प्रकाश आंबेडकर यांना द्यायला तयार आहे. त्यांनी त्यांचा पक्ष विसर्जित करून आरपीआयमध्ये यावे, असं आवाहन रामदास आठवले यांनी केलं आहे.
आरक्षणासाठी दोन वर्ग तयार करा
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आमचा पाठिंबा आहे. ज्यांचे उत्पन्न 8 लाखाच्या आतील आहे, त्या लोकांना आरक्षण मिळते. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. नरेंद्र मोदी यांचे मंत्रिमंडळ प्रयत्न करत आहे. ओबीसीच्या आरक्षणला धक्का न लागता आरक्षण मिळावे असा प्रयत्न सुरू आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण हवे आहे. मराठा समाजाचा वेगळा वर्ग बनवून तामिळनाडूच्या धर्तीवर आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा. दोन वर्ग तयार करून आरक्षण देता येऊ शकते, असा प्रस्ताव मी सरकारला दिला आहे. याबाबत 20 जानेवारीच्या अगोदर निर्णय होईल. त्यामुळे जरांगे पाटील यांना मुबईला यायला लागणार नाही. म्हणून जरांगे यांनी तात्पुरता मोर्चा रद्द करावा. सरकारला वेळ द्यावा. सरकार सकारात्मक आहे, असं रामदास आठवले यांनी सांगितलं.
वाद मिटवा, ताकद वाया घालवू नका
मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्या वादावरही त्यांनी भाष्य केलं. दोघांचाही वाद मिटला पाहिजे. दोघांनीही त्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. दोघानी भांडण करून ताकद वाया घालवू नये, असं आवाहन आठवले यांनी केलं.
मोदींना हरवूच शकत नाही
2024 च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवणार आहोत. आम्हाला 4 जागा मिळतील. इंडिया आघाडीला फारसे यश मिळणार नाही. विरोधकांनी कितीही प्रयत्न केला तरी ते मोदी यांना हरवू शकत नाही. कारण जनता मोदींच्या बाजूने आहे, असा दावाही त्यांनी केला.
पवार निवृत्त होणार नाहीत
मोदींना हरवण्यासाठी सर्व पैलवान एकत्र आले आहेत. पण आमचे पैलवान हरणार नाहीत. कारण जनता आमच्या सोबत आहे. अजित पवार आमच्यासोबत आल्याने आमचा नक्कीच फायदा होईल. अजित पवार यांनी बंड केले असल्याने शरद पवार निवृत्ती घेणार नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्रामध्येच गरज आहे. फडणवीस यांनी दिल्लीत येण्याची गरज नाही. अजित पवार आता लगेच मुख्यमंत्री होतील अशी परिस्थिती नाही. आता एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली चांगले काम सुरू आहे, असंही त्यांनी सांगितलं.