Sharad Pawar यांच्या निवृत्तीनंतर कोण होणार राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष? ही नावे चर्चेत

| Updated on: May 02, 2023 | 1:35 PM

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली आणि आता नव्या अध्यक्षाची चर्चा सुरु झालीये. अध्यक्षपदासाठी अनेक नावे चर्चेत आहेत. कोण आहेत ते नेते.

Sharad Pawar यांच्या निवृत्तीनंतर कोण होणार राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष? ही नावे चर्चेत
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष ( NCP Chief ) शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी आज मोठी घोषणा केलीये. शरद पवार यांनी त्यांच्या ‘लोक माझे सांगाती’ भाग-2 या आत्मचरित्र पुस्तकाचे मुंबईत प्रकाशन सोहळादरम्यान ही घोषणा केली आहे. यापुढे आपण कोणतीही निवडणूक लढवणार नाही, तसेच आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार असल्याची घोषणा शरद पवार यांनी केली आहे. शरद पवार यांच्या या घोषणेनंतर आता राष्ट्रवादीचा पुढील अध्यक्ष कोण? यावर चर्चा रंगू लागल्या आहेत.

शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ भाग-2 या पुस्तकातून शरद पवारांनी अनेक धक्कादायक खुलासे केल्याचे सांगण्यात येत आहे. शरद पवार हे भारताच्या राजकारणातील दिग्गज नेते आहेत. त्यांच्या राजकारणातील अनुभव हा सगळ्यांनाच माहित आहे. पण आता त्यांच्या निवृत्तीनंतर राष्ट्रवादीची धुरा कोणत्या नेत्याकडे जाणार याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

प्रफुल्ल पटेल

राष्ट्रवादीचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल हे महाराष्ट्रामधील एक मोठे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री आहेत. ते ४ वेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत. तर राज्यसभा सदस्य देखील राहिले आहेत. केंद्रीय मंत्रीमंडळामध्ये त्यांनी अनेक पदे भुषवली आहेत.  ते अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष देखील आहेत. त्यामुळे त्यांचं नाव राष्ट्रवादीच्या नव्या अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे.

जयंत पाटील

जयंत पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणातले मोठे नेते आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील माजी मंत्री आहेत. राष्ट्रवादी पक्षात त्यांचं स्थान मोठं आहे. त्यामुळे त्यांचं नाव देखील आघाडीवर आहे.
अजित पवार
विरोधीपक्ष नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव देखील चर्चेत आहे. राष्ट्रवादीत ते नंबर २ चे नेते आहेत. अजित पवार हे भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगल्या आहेत. पण आता शरद पवार हे निवृत्त होत असल्याने त्यांचं नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे.
सुप्रिया सुळे
सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठे नेत्या आहेत.  त्या बारामतीच्या विद्यमान खासदार आहेत. सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ह्यांच्या कन्या असून गेले अनेक वर्षे त्या राजकारणात सक्रीय आहेत. त्यामुळे त्यांचं देखील नाव चर्चेत आहे.