उद्धव ठाकरे खंजीर खुपसतात तेव्हा अजित पवार यांना सोबत घ्यावेच लागते; देवेंद्र फडणवीस यांचं थेट उत्तर
पाच वर्ष आम्ही सरकार चालवलं. अर्ध्या रात्री उद्धव ठाकरे यांनी फोन केला तरी त्यांच्या कोणत्याही कामाला मी कधीच नाही म्हटलं नाही. त्यांना मान ठेवला. मुख्यमंत्री असूनही मी स्वत: मातोश्रीवर जायचो.
मुंबई | 23 जुलै 2023 : जेव्हा उद्धव ठाकरे तुमच्यापाठीत खंजीर खुपसतात, तेव्हा तुम्हाला अजित पवार यांना सोबत घेऊन शपथ घ्यावीच लागते. नाही तर उद्धव ठाकरेच यशस्वी होतात. पाठीतला खंजीरच यशस्वी होतो. त्यामुळे माझ्या पाठितील खंजीर काढून मी ताठ उभा राहू शकतो. तुमचा मुकाबला करू शकतो. तुम्हाला घरी पाठवू शकतो हे दाखवून द्यावं लागतं, अशी रोखठोक प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
आजही उद्धव ठाकरे, त्यांचे कार्यकर्ते आणि एनसीपीच्या ट्रोलर्सना माझं ओपन चॅलेंज आहे, आमच्या विरोधातील एक गोष्ट जरी तुमच्यासमोर असेल तर ती समोर घेऊन या… एक गोष्ट आणा मार्केटमध्ये. ओपन चॅलेंज आहे, असं आव्हानच देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. खुपते तिथे गुप्ते या टीव्ही शोमध्ये ते बोलत होते.
भीष्म पितामह कोण?
राज्यात द्वेषाचं राजकारण सुरू आहे. त्याचं जनकत्व देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला दिलं आहे. महाविकास आघाडीचं सरकार आलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या कार्यकर्त्यांच्या टीमने वैयक्तिक खालची पातळी गाठली. ती राज्यातील राजकीय संस्कृतीला वाईट कलाटणी देणारी होती. मग याचे भीष्म पितामह कुणाला म्हणता येईल?, असा सवाल फडणवीस यांनी केला.
रात्री अॅक्टिव्ह राहणं सोपं असतं
मी रात्री जास्त अॅक्टिव्ह असतो. रात्री खूप एनर्जी असते. कधी कधी काही गोष्टी जास्त सोप्या असतात करण्यासाठी. मी दिवसाही तेवढाच अॅक्टिव्ह असतो असं सांगतानाच मी जगातील सर्वात प्रामाणिक माणूस आहे असा माझा दावा नाही. राजकारणात कॉम्प्रमाईज करावाच लागतो. शेवटी जो आदर्शवाद गेमच्या बाहेर टाकेल, त्याचा फायदा नसतो. गेममध्ये राहिला तर आदर्शवादी राहता येतं, असं ते म्हणाले.
त्यांचा मान राखला
पाच वर्ष आम्ही सरकार चालवलं. अर्ध्या रात्री उद्धव ठाकरे यांनी फोन केला तरी त्यांच्या कोणत्याही कामाला मी कधीच नाही म्हटलं नाही. त्यांना मान ठेवला. मुख्यमंत्री असूनही मी स्वत: मातोश्रीवर जायचो. कुठेही मानापमान नाट्य केलं नाही. अनेकवेळा प्रोटोकॉलमध्ये पंतप्रधानांआधी मुख्यमंत्री बोलतो. मग इतर वक्ते बोलतात.
मी प्रोटोकॉल तोडून माझ्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांना भाषण करायला द्यायचो. एवढं सर्व असताना. ठिक आहे. तुमचं नाही पटलं. तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं. तुम्हाला दुसऱ्यासोबत जायचं होतं तर हिंमतीने सांगितलं पाहिजे होतं, असा हल्लाच त्यांनी उद्धव ठाकरेंवर चढवला.