Explainer : काँग्रेसच्या पराभवाची 5 सर्वात मोठी कारणं, मध्य प्रदेश आणि राजस्थान, आणि छत्तीसगडमध्ये अपयश का?
देशातील तीन राज्यांमध्ये काँग्रेसला सर्वात मोठा झटका बसला आहे. यापैकी दोन राज्यांमध्ये तर काँग्रेसच्या हातातून सत्ता निसटली आहे. काँग्रेसच्या या पराभावामागे काही महत्त्वाची कारणे आहेत. या कारणांचा काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीआधी विचार केला तर काँग्रेसच्या पारड्यात भविष्यात चांगलं यश मिळू शकेल.
मुंबई | 3 डिसेंबर 2023 : देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीचा निकाल आज समोर येतोय. या पाच पैकी तीन राज्यांमध्ये भाजपला सर्वात मोठं यश मिळताना दिसत आहे. विशेष म्हणजे दोन राज्यांमध्ये काँग्रेसच्या हातून सत्ता निसटताना दिसत आहे. राजस्थान आणि छत्तीसगडमधून काँग्रेसच्या हातून सत्ता निसटताना दिसत आहे. या दोन्ही राज्यांमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून येताना दिसत आहे. तर मध्य प्रदेशातदेखील भाजपला मोठं यश मिळताना दिसत आहे. केवळ तेलंगणा राज्यात काँग्रेसला यश मिळताना दिसत आहे. काँग्रेसने तेलंगणा राज्यात सत्ताधारी बीआरएस पक्षाला मोठा झटका दिला आहे. पण इतर तीन राज्यांमध्ये काँग्रेसला जिंकून येण्याची मोठी संधी होती. पण ती संधी काँग्रेसच्या हातून निसटली आहे. दोन राज्यांमध्ये तर हातातली सत्ता निसटताना दिसत आहे. काँग्रेसच्या तीन राज्यांमध्ये पराभवाला काही कारणं आहेत. या कारणांचं विश्लेषण होणं गरजेचं आहे.
1) काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस
काँग्रेसच्या पराभवामागील सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे काँग्रेसमध्ये असणारी अंतर्गत धुसफूस आणि गटबाजी. मध्य प्रदेश आणि राजस्थान या दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेस पक्षात मोठी गटबाजी बघायला मिळाली आहे. राजस्थानात मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि काँग्रेस नेता सचिन पायलट यांच्यातील गटबाजी स्पष्टपणे दिसत होती. विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षात दोन्ही गटात सातत्याने संघर्ष बघायला मिळाला. मध्य प्रदेशात एकेकाळी काँग्रेसचा सर्वात मोठा चेहरा असलेलेल नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपमध्ये गेल्यानंतर काँग्रेसला त्याचा मोठा फटका बसला. काँग्रेसचे अनेक नेते त्यांच्यासोबत गेले. शिंदे यांच्यामुळे निर्माण झालेली पोकळी काँग्रेसमध्ये अजून भरुन निघालेली नाही.
2) नेतृत्वावरील कमी विश्वास
काँग्रेसच्या नेतृत्वाबाबत अनेकांकडून शंका व्यक्त केली जाते. काँग्रेसचं नेतृत्व कमजोर असल्याची चर्चा सुरु असते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने मास लीडर (जननेता) म्हणून आपली छवी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांची यात्रा जिथून-जिथून गेली तिथे लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यांच्या यात्रेत सहभागी झाले, पण मतदानात तेवढं यश मिळताना दिसलं नाही. काँग्रेसच्या संघटनेतील नेत्यांमध्येच आपल्या नेतृत्वाबाबत विश्वासाची कमतरता जाणवते, त्यामुळे त्याचा फायदा थेट भाजपला या निवडणुकीत होताना दिसला.
3) कमजोर कम्युनिकेशन
एक महत्त्वाचा मुद्दा आहे, काँग्रेसच्या नेतृत्वाकडून जितक्या प्रभावाने लोकांसमोर विचार मांडण्याची गरज होती तितक्या प्रभावाने काँग्रेस नेत्यांना मांडता आलं नाही, अशी सर्वसामान्यांमध्ये चर्चा आहे. याउलट भाजपकडून नेतेमंडळींची फौजच प्रचारात कामाला लागली होती. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री आणि नेतेमंडळींना अतिशय प्रभावीपणे प्रचार केला. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी प्रचार जोरदार केला. पण प्रियंका सर्वसामान्यांपर्यंत त्यांचं म्हणणं पटवून देण्यात तितक्या यशस्वी ठरल्या नाहीत. हीच स्थिती काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत आहे. त्यांनी प्रचार केला. ते लोकांशी तितके कनेक्ट होऊ शकले नाहीत. याउलट भाजप नेत्यांना ते जमलं. निवडणुकीचे आकडे तेच सांगत आहेत.
4) स्थानिक पातळीवर संघटनेत कमी पकड
सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे काँग्रेसची स्थानिक पातळीवर संघटनेत हवी तशी पकड बघायला मिळत नाही. एक काळ होता, काँग्रेसचं सर्वात मोठी ताकदवान संघटना होती. पण वेळेनुसार आता त्यात बदल होताना दिसत आहे. काँग्रेस सेवा दल, महिला काँग्रेस, सर्वोदय, यूथ काँग्रेस सारख्या संघटना स्थानिक पातळीवर खूप काम करायच्या. त्यांचा संपर्क थेट जनतेशी असायचा. त्यामुळे सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवणं सोपं होतं. पण गेल्या काही काळापासून या संघटना अतिशय सुस्त झाल्याचं बघायला मिळतं. राज्यात सरकार असूनही सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचू न शकल्याने काँग्रेसच्या पदरी हे अपयश आलं आहे.
5) मोदींवर विरोधात नको तेवढी टीका
काँग्रेस नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मोदींवर घणाघाती टीका केली. पण त्यांची हीच टीका आपल्या बाजूने जनतेसमोर वळवण्यात, सहानुभूती मिळवण्यात भाजप नेते यशस्वी झाले. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, पंतप्रधान नेरेंद्र मोदी खोटं बोलणाऱ्यांचे सरदार बनले आहेत. त्यांच्या या टीकेवरुन जोरदार वाकनाट्य रंगलं. पण त्याचा फायदा भाजपलाच होताना दिसला.