Ajit Pawar : अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यात अजित पवार का दिसले नाहीत? अमोल मिटकरींनी दिलं उत्तर
Ajit Pawar : सध्या मुंबईत गणेशोत्सवाचा उत्साह आहे. त्याचवेळी राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु आहे. राजकीय नेते विविध गणेश मंडळांना भेटी देत आहेत. त्याचवेळी एखाद्या मोठ्या नेत्याच्या दौऱ्यावेळी प्रत्येक घडामोडीकडे प्रसारमाध्यमांच बारीक लक्ष आहे. आज अजित पवार यांच्या अनुपस्थितीची चर्चा रंगली आहे.
देशाचे केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा नेते अमित शाह मुंबई दौऱ्यावर आहेत. आज मुंबईत अमित शाह यांनी सपत्नीक ‘लालबागचा राजा’ या प्रसिद्ध गणरायाच दर्शन घेतलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार उपस्थित होते. यानंतर अमित शाह यांनी भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या वांद्य्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट दिली. अमित शाह यांच्या या मुंबई दौऱ्यात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस दिसले. पण अजित पवार दिसले नाहीत. त्यावरुन विविध तर्क-वितर्क सुरु झाले आहेत. अलीकडे महायुतीमध्ये विसंवाद निर्माण झाल्याच चित्र आहे. खासकरुन शिवसेना शिंदे गटातील नेते सातत्याने अजित पवार यांच्याविरोधात बोलताना दिसतायत. त्याशिवाय अजित पवार यांनी गडचिरोली जिल्ह्यातल्या आलापल्ली इथे बोलताना ‘कुटुंबात फूट पडू देऊ नका, मी चूक केली’ अशी कबुली दिली.
त्यामुळे अजित पवार यांच्या मनात काय चाललय? अजित पवार महायुतीमध्ये नाराज तर नाहीत ना? अशी चर्चा सुरु झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीला आता दोन महिने उरले आहेत. सर्वच पक्षांकडून रणनिती आखली जातेय. त्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांच्यासारखे दिग्गज नेते मुंबईत आल्यानंतर अजित पवार यांची अनुपस्थिती दिसल्यास चर्चा होणं स्वाभाविक आहे. आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
‘अजित पवार कशाला जातील?’
“काल अजित पवार यांचे बारामतीत ठरलेले कार्यक्रम होते. आज अजित पवार मुंबईत आले आहेत. अजित दादा अमित शाहंसोबत आहेत. त्यांना सोडायला विमानतळावर जातील. सागर बंगल्यावर भाजपच्या बैठकीत अजित पवार कशाला जातील? महायुतीच्या बैठकीत अजित पवार जातील” असं आमदार अमोल मिटकरी यांनी सांगितलं.