Maharashtra Cabinet Expansion: तावडे पोहोचले पण पंकजा मुंडे मंत्रिमंडळ विस्ताराकडे फिरकल्याही नाहीत, चर्चा पुन्हा चर्चाच ठरली
Maharashtra Cabinet Expansion : आपल्या समर्थकांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार नसल्याची कुणकुण लागल्यामुळेच पंकजा मुंडे या मंत्रिमंडळ विस्ताराच्या सोहळ्याला आल्या नसाव्यात असं सांगितलं जातं. मात्र, पंकजा मुंडे यांचं या सोहळ्याला न येण्याचं कारण काहीही असलं तरी पंकजा मुंडे यांच्या गैरहजेरीची चर्चा मात्र रंगली आहे.
मुंबई: राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा आज अखेर मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) झाला. आज शिंदे गटाच्या आणि भाजपच्या मिळून एकूण 18 मंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. या शपथविधी सोहळ्याला विरोध पक्षनेते अजित पवार उपस्थित होते. भाजपचे (bjp) वरिष्ठ नेतेही उपस्थित होते. केंद्रातील काही मंत्रीही खास शपथविधी सोहळ्यासाठी आले होते. एवढेच नव्हे तर फारसे चर्चेत न राहणारे विनोद तावडेही या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे मात्र या शपथविधी सोहळ्याला हजर नव्हत्या. पंकजा मुंडे (pankaja munde) शपथविधी सोहळ्याला उपस्थित न राहिल्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. पंकजा मुंडे नाराज आहेत का? की इतर कामात व्यस्त असल्यामुळे त्या आजच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिल्या नाहीत, अशी चर्चा रंगली आहे.
अखेर 38 दिवसानंतर राजभवनातील दरबार हॉलमध्ये भाजप आणि शिंदे गटाच्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी राज्यातील बडे नेते उपस्थित होते. केंद्रातून फक्त रावसाहेब दानवे हे उपस्थित होते. तर विनोद तावडे यांनीही या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली होती. तब्बल अडीच वर्षानंतर राज्यात भाजपचं सरकार आल्यानंतर भाजपचे सर्व नेते या सोहळ्याला उपस्थित राहतील अशी शक्यता होती. भाजप नेत्या पंकजा मुंडे या सुद्धा या सोहळ्याला उपस्थित राहतील अशी चर्चा होती. मात्र, त्या हजर न राहिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
तेव्हा सक्रिय, आता मात्र गायब
राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे सक्रिया झाल्या होत्या. त्यानंतर शिंदे गटाने बंड केलं. तेव्हाही भाजपच्या होणाऱ्या बैठकांमध्ये पंकजा मुंडे यांनी आवर्जुन भाग घेतला होता. त्यामुळे पंकजा मुंडे राज्यात पुन्हा एकदा सक्रिय झाल्या असून राज्यातील नेत्यांबद्दलची त्यांची कटुता दूर झाल्याचं सांगितलं जात होतं. पण आज पंकजा यांनी मंत्रिमंडळाच्या विस्ताराला दांडी मारल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
ती एक गोष्ट Fadnavis येणाऱ्या प्रत्येक मंत्र्याला सांगत राहीले, शिंदेंना मान!#MaharashtraCabinet #CabinetExpansion2022 #ShindeFadnavis #EknathShinde #DevendraFadnavis pic.twitter.com/ASKU8cswB4
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 9, 2022
फडणवीस गटाच्या वर्चस्वामुळे नाराजी?
दरम्यान, आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात फडणवीस यांच्या गटाचं वर्चस्व राहिलं आहे. अगदी चंद्रकांत पाटील, अतुल सावे, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, रवींद्र चव्हाण या फडणवीसांच्या जवळच्या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. या विस्तारात पंकजा मुंडे यांच्या एकाही समर्थक आमदाराला संधी देण्यात आलेली नाही. आपल्या समर्थकांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार नसल्याची कुणकुण लागल्यामुळेच पंकजा मुंडे या मंत्रिमंडळ विस्ताराच्या सोहळ्याला आल्या नसाव्यात असं सांगितलं जातं. मात्र, पंकजा मुंडे यांचं या सोहळ्याला न येण्याचं कारण काहीही असलं तरी पंकजा मुंडे यांच्या गैरहजेरीची चर्चा मात्र रंगली आहे.