Eknath Khadse : एकनाथ खडसे पुन्हा भाजपात जाणार? खुद्द खडसेंनी सांगितली सत्य परिस्थिती!
Eknath Khadse Latest News : एकनाथ खडसे पुन्हा भाजपात येणार आहेत का? असा प्रश्न विचारल्यानंतर त्यावर थेट भाष्य करणं रक्षा खडसे यांनी टाळलं होतं. दरम्यान, आता खडसे आणि शाह यांच्यात फोनवरुन संवाद झाला असल्याचं समोर आलंय.
रवी गोरे, प्रतिनिधी, जळगाव : एकनाथ खडसे (Eknath Khadse News) हे पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार की काय? अशा चर्चांना उधाण आलं आहे. भाजप खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी अमित शाह (Amit Shah And BJP) आणि एकनाथ खडसे यांच्यात फोनवरुन चर्चा झाली असल्याचं माध्यमांशी बोलताना म्हटलं. त्यानंतर राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लढवले जाऊ लागले. अखेर खुद्द एकनाथ खडसे यांनीच या सगळ्यावर भाष्य करत स्पष्टीकरण दिलंय. ‘एकाच घरात दोन लोकं दोन वेगवेगळ्या पक्षात असणं काही नवं नाही. आमच्याही घरात तसं आहे’, असं त्यांनी म्हटलंय. शिवाय भाजपमध्ये जाण्याच्या वृत्ताचंही एकनाथ खडसे यांनी खंडन केलंय.
‘अमित शाह हे केंद्रीय गृहमंत्री आहे. त्यासाठी त्यांच्याशी फोनवरुन बातचीत केली होती’, असंही खडसे यांनी म्हटलंय. मुळात एकनाथ खडसे आणि अमित शाह यांच्यात भेट होणार होती. पण अमित शाह यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे ही भेट शक्य होऊ शकली नाही. म्हणून फोनवरुन त्यांनी अमित शाह यांच्याशी संवाद साधला होता, अशी माहिती रक्षा खडसे यांनी दिली. त्यावरुन पत्रकारांनी रक्षा खडसे यांना आणखी एक महत्त्वाचा प्रश्न केला होता.
एकनाथ खडसे पुन्हा भाजपात येणार आहेत का? असा प्रश्न विचारल्यानंतर त्यावर थेट भाष्य करणं रक्षा खडसे यांनी टाळलं होतं. दरम्यान, आता खडसे आणि शाह यांच्यात फोनवरुन संवाद झाला असल्याचं समोर आलंय. या चर्चेत नेमकं काय घडलं, यावरुन आता तर्क वितर्क लढवले जात आहेत.
एकनाथ खडसे हे सूनबाई रक्षा खडसे यांच्यासोबत दिल्लीला गेले होते. दिल्लीत अमित शाह यांची भेट घेण्यासाठी गेलेल्या एकनाथ खडसेंच्या दिल्लीवारीचं कारण नेमकं काय होतं, यावरुन चर्चांना उधाण आलं होतं.
आयुष्यभर एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये जळगावात दमदार कामगिरी केली होती. पण गेल्या काही वर्षांपासून एकनाथ खडसे हे भाजपात नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. अखेर एकनाथ खडसे यांनी शरद पवारांच्या नेतृत्त्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर खडसेंनी भाजपवर अनेकदा उघडपणे टीकाही केलीय.
23 ऑक्टोबर 2020 साली खडसेंनी भाजपला सोडचिट्ठी दिली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचं घड्याळ हाती घेऊन खडसेंनी राजकारणाच्या नव्या इनिंगला सुरुवात केली होती. आता पुन्हा एकदा शाहांसोबत झालेल्या फोनवरील चर्चेमुळे खडसें पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत की काय? यावरुन राजकीय चर्चा रंगल्यात. पण खडसेंनी हे फेटाळून लावलंय. शाहांसोबत झालेल्या फोनवरील चर्चेचे राजकीय अर्थ काढू नये, असंही ते म्हणालेत.