मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. शिवसेना आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची नक्कल केल्यानं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह भाजपचे आमदार चांगलेच आक्रमक झाले. भास्कर जाधवांनी माफी मागावी नाहीतर त्यांचं निलंबन करावं अशी मागणी विरोधकांनी लावून धरली. सुरुवातीला कडक भूमिका घेणाऱ्या भास्कर जाधवांनी नंतर बिनशर्त माफी मागत असल्याचं सांगत विषयावर पडदा टाकला. मात्र, 12 आमदारांचं निलंबन केल्यामुळेच मी भाजपच्या रडारवर असल्याची टीका जाधव यांनी माध्यमांशी बोलताना केलीय.
पक्षातील वरिष्ठांनी मला सांगितलं की पंतप्रधानांची नक्कल केली आहे तर तुम्ही शब्द मागे घ्यावे. त्यामुळे बिनशर्त माफी मागितली. पण फडणवीसांना टोला लगावत म्हणालो की आम्ही एकाच शाळेतील आहोत. सचिन सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत कशा पद्धतीची टीका-टिप्पणी, नकल्या केल्या त्याचा व्हिडीओ टाकला आहे. त्यामुळे कोणतीही व्यक्तिगत टीका केली नाही. भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन केल्यामुळे मी त्यांच्या रडारवर आहे. माझ्या विरोधात हक्कभंग आणण्याचा त्यांच्या प्रयत्न आहे. मी त्याला उत्तर देईन, असं भास्कर जाधव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
भास्कर जाधवांनी सभागृहात पंतप्रधानांची नक्कल केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं तत्काळ निलंबन करण्याची मागणी केली. सभागृहात भास्कर जाधव यांना निलंबित करा, अशा घोषणा सुरु झाल्या. ‘सभागृहात देशाच्या पंतप्रधानांची नक्कल सहन केली जाणार नाही. ‘ अंगविक्षेप करतायत ते सहन केलं जाणार आहे का, ही पद्धत आहे का सभागृहाची? अंगविक्षेप करून भास्कर जाधव जे बोलतायत हे शोभनीय नाही. हे चालत नाही. आम्ही यांच्या नेत्यांचीही अशाच प्रकारे नक्कल केली. हे चालेल का सभागृहाला? त्यांनी माफी मागितली पाहिजे, अध्यक्ष महोदय,” अशी आक्रमक मागणी फडणवीसांनी केली.
देवेंद्र फडणवीस यांनी सभागृह स्थगित करण्याची मागणी केली. त्यानंतर भास्कर जाधव यांनी उभे राहून, या सर्व प्रकरणावर माफी मागितली. पंतप्रधानांबद्दल केलेले वक्तव्य मी मागे घेतो, तसेच माझे अंगविक्षेपही मागे घेतो, असे ते म्हणाले.
इतर बातम्या :