राष्ट्रवादी पक्षाचा कारभारच नियमबाह्य, जयंत पाटील अध्यक्ष नाहीच, प्रफुल्ल पटेल यांचा मोठा आरोप
ajit pawar and sharad pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडींवर अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी गुरुवारी शरद पवार यांनी घेतलेली बैठक अधिकृत नसल्याचे स्पष्ट केले.
अभिजित पोते, मुंबई : राष्ट्रवादी पक्षातील वादावर शुक्रवारी प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. पक्षाची गुरुवारी झालेली बैठक अधिकृत नव्हती. पक्षात कधीही पक्षाच्या घटनेनुसार कामकाज झाले नाही. घटनेनुसार निवड झाल्या नाहीत. पक्षाच्या घटनेनुसार जयंत पाटीलसुद्धा प्रदेशाध्यक्ष नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी केले. आम्हीच अधिकृत आहोत. बैठका घेण्याचा त्यांना अधिकार नाहीच, असा दावा पटेल यांनी केला.
अजित पवार यांची निवड
३० जूनला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक बैठक झाली होती. या बैठकीत मोठ्या संख्येने आमदार उपस्थित होते. त्या बैठकीत सर्वांनी एकमताने अजित पवार यांना आपला नेता म्हणून निवडला आहे. त्यांनी आधी मला राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त केल्याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. त्यानंतर ही माहिती अजित पवार यांनी विधानसभा अध्यक्षांना दिली. तसेच निवडणूक आयोगालाही कळवली आहे, असे प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले. संख्याबळानुसार पक्ष अजित पवार यांच्या पाठिशी आहे. दिल्लीत गुरुवारी झालेली बैठक अधिकृत नाही. पक्ष म्हणून आम्ही निवडणूक आयोगाकडे चिन्हाची मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी पक्ष घटनेनुसार चालला नाही
आमच्या पक्षाचं एक संविधान आहे. त्यानुसार आमचा पक्ष चालवला जाणे अपेक्षित आहे. आमच्या पक्षाच्या संविधानात निवडणुका करणे आवश्यक आहे. संविधानानुसार निवड चालत नाही, निवडणुकाच घ्याव्या लागतात. नेमणुकीचा अधिकार कुणालाच नाही. सप्टेंबर २०२२ मध्ये माझ्याच सहीने राज्याचे प्रमुख निवडले आहेत. त्यावेळी कुठलीही निवडणुक झाली नाही. आमच्या पक्षात अनेक वर्ष निवडणुका झाल्याचं नाहीत. २०२२ मध्ये सुद्धा आमचे अधिवेशन झालं होते. पण त्याला अधिवेशन कसं म्हणता येईल. कारण त्यावेळी पक्षाची निवडणूक झालीच नव्हती, असा आरोप प्रफुल्ल पटेल यांनी केला.
आमच्यावर कोणी कारवाई करु शकत नाही. कुणीही कुणाला पक्षातून काढू शकत नाही. तो अधिकार केवळ निवडणूक आयोगाला आहे. आम्ही अधिकृत असल्यामुळे आम्ही जो निर्णय घेऊ, तोच निर्णय अधिकृत असणार आहे, असे पटेल यांनी सांगितले.