Sandeep Deshpande : ‘नीच, घाणेरडं, जागा हडप…’, वरळीच्या जांबोरी मैदानवरुन मनसे-उद्धव ठाकरे गटात काय घडतय?
Sandeep Deshpande : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरळीमधील राजकीय वातावरण तापू लागलं आहे. आज मनसेने आदित्य ठाकरे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. मनसेने पत्रकार परिषद घेऊन एक ऑडिओ क्लिप सुद्धा ऐकवली. वरळी हा उद्धव ठाकरे यांचे सुपूत्र आदित्य ठाकरे यांचा विधानसभा मतदारसंघ आहे.
वरळीच्या जांबोरी मैदान परिसरात उद्धव ठाकरे गट आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. त्यावरुन आता राजकारण रंगलं आहे. आज मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी एक पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी एक ऑडिओ क्लिप ऐकवली. “आजच्या जांबोरी मैदान वरळी येथे धक्काबुक्कीचा जो प्रसंग झाला, त्यावेळी मी स्वत: तिथे उपस्थित नव्हतो” असं तो ऑडिओवर बोलणारा व्यक्ती सांगत होता. “जो माणूसच तिथे नव्हता, त्याला तुम्ही तक्रार करायला नेता. उद्धव ठाकरे गट किती घाणेरडं आणि नीच राजकारण खेळतोय” असा आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे.
“तुम्हाला जागा हडप करायची आहे. तुम्ही सिनियर सिटीझनच्या खांद्यावर बंदुक ठेऊन आमच्यावर गोळी झाडता. जनता मूर्ख नाहीय. तुम्ही जागा हडप केल्याची अनेक उद्हारण शिवाजी पार्कला दाखवून देऊ शकतो. सन्मानीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेऊन महापौर बंगला हडप केला” असा आरोप संदीप देशपांडे यांनी केला. “आदित्य ठाकरेंनी शिवाजी पार्क मैदानाची वाट लावली, आता त्यांना जांबोरी मैदानाची वाट लावायची आहे” असा आरोप संदीप देशपांडे यांनी केला.
महायुती, मनसेला का वाटतं वरळी जिंकता येईल?
पुढच्या काही दिवसात वरळीतमधील राजकारण आणखी तापू शकतं. वरळी हा उद्धव ठाकरे यांचे सुपूत्र आदित्य ठाकरे यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. तिथून ते आमदार आहेत. मनसे वरळीमधून संदीप देशपांडे यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. त्याची मोर्चेबांधणी त्यांनी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीच्यावेळी वरळी विधानसभा मतदारसंघातून अरविंद सावंत यांना 6 हजारपेक्षा फक्त थोड्या जास्त मतांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे वरळी जिंकता येऊ शकते असं महायुती आणि मनसेला वाटतं. त्या दृष्टीने आखणी सुरु झाली आहे. महायुतीने वरळीमध्ये उमेदवार उभा न करता मनसेला पाठिंबा दिला, तर ठाकरे गटाच्या अडचणी आणखी वाढू शकतात.
मनसे कार्यकर्त्याच्या मृत्यूवर संदीप देशपांडे काय म्हणाले?
अमोल मिटकरी यांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी सुद्धा संदीप देशपांडे बोलले. “मनसे आक्रमक आहे, राहणार. आपली लायकी, पातळी काय हे समजून घेणार नसतील तर आमचे कार्यकर्ते प्रसाद देतील” असं ते म्हणाले. मिटकरी यांच्या कारवरील हल्ल्यानंतर एका मनसे कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. त्यावर देशपांडे म्हणाले की, ‘तो 28 वर्षांचा होता, अटॅक आला, त्याचे राजकारण करू नये’